आयसीटीच्या १९ वर्षांच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या

माटुंगा येथील वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – आयसीटीच्या सिद्धार्थ पाटील नावाच्या एका १९ वर्षांच्या आभियांत्रिकी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. माटुंगा येथील वसातिगृहात गळफास घेऊन त्याने जीवन संपविले होते. या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र सिद्धार्थ हा काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. सिद्धार्थचा मोबाईल पोलिसानी ताब्यात घेतला असून त्याच्या कुटुंबियसह नातेवाईक आणि मित्रांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून काही गोष्टीचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सिद्धार्थ हा मूळचा नाशिकचा रहिवाशी असून त्याचे कुटुंबिय तिथेच राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये प्रवेश घेतला होता. सध्या तो केमिकल इंजिनिअरच्या दुसर्‍या वर्षांत शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र त्यातून त्याला काहीच फरक जाणवत नव्हता. मंगळवारी रात्री त्याने डॉक्टरांना कॉल करुन आपण जीवन संपविणार असल्याचे सांगितले होते. ही माहिती नंतर डॉक्टरकडून त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला कॉल करण्यास सांगून मित्राला त्याच्या रुममध्ये पाठविले होते.

मात्र तिथे गेलेल्या मित्रांना सिद्धार्थने आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती नंतर वसतिगृहाच्या वरिष्ठ अधिकार्‍यासह माटुंगा पोलिसांना देण्यात आली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी सिद्धार्थला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. मित्रांच्या चौकशीदरम्यान सिद्धार्थ हा काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता. त्यातून त्याला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने गळफस घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी माटुुंगा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. सिद्धार्थच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली असून ते मुंबईत दाखल झाले आहेत.

शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या पालकांना सोपविण्यात येणार आहे. सिद्धार्थच्या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही. त्याच्या मित्रांसह कुटुंबिय आणि नातेवाईकांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून काही गोष्टींचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आयआयटीमध्ये साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता सिद्धार्थ पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबाबत संस्थात्मक उत्तरदायित्वबाबत चिंता व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page