एक वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश करुन महिलेस अटक

मुलीची सुखरुप सुटका करुन पालकांच्या स्वाधीन दिले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – गावी जाणारी ट्रेन निघून गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात पालकांसोबत झोपलेल्या एक वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन पळून गेलेल्या आरोपी महिलेस काही तासांत सीएसएमटी रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सयुक्तपणे केलेल्या कारवाईत शिताफीने अटक केली. मुलीचे अपहरण करुन ही महिला दिवा येथे निघून गेली होती. सीसीटिव्ही फुटेजवरुन तिचा मागोवा घेत पोलिसांनी महिलेस अटक करुन तिच्या तावडीतून एक वर्षांच्या मुलीची सुखरुप सुटका केली. तिला नंतर तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

यातील तक्रारदार मूळचे धाराशिवचे रहिवाशी आहे. १५ ऑक्टोंबरला ते त्यांच्या गावी जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आले होते. मात्र त्यांची ट्रेन निघून गेल्याने ते त्यांच्या पत्नी आणि एक वर्षांच्या मुलीसोबत रेल्वे स्थानकाच्या मेन लाईन फलाट क्रमांक १२/१३ च्या समोरील स्टिलच्या बाकड्याजवळ झोपले होते. १६ ऑक्टोंबरला पहाटे चार वाजता ते सव्वापाचच्या सुमारास त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मुलीचे अपहरण केले होते. हा प्रकार नंतर तक्रारदाराच्या लक्षात येताच त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांना त्यांची मुलगी कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलीच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये एक महिला बळीत मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. ही महिला सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरुन पनवेल स्लो लोकल पकडून निघून गेली होती. पुढील सर्व रेल्वे स्थानकाचे फुटेज ताब्यात घेतल्यानंतर ती मशिदबंदर रेल्वे स्थानकात उतरली आणि नंतर तिने टिटवाळा लोकल पकडली होती. टिटवाळा रेल्वे ज्या ज्या रेल्वे स्थानकात थांबते, त्या सर्व रेल्वे स्थानकाचे फुटेज ताब्यात घेतल्यानंतर ती दिवा रेल्वे स्थानकात उतरुन सदगुरु नगर परिसरात गेल्याचे दिसून आले.

हाच धागा पकडून पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोपान काकड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्‍विनी पाटील, पोलीस हवालदार नांगरे, पोलीस शिपाई पाटील, जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंगरपल्लू, सोनार, पोलीस हवालदार राजेश राठोड, टिंगरे, ठाकूर, महिला पोलीस हवालदार स्मिता भोईटे, महिला पोलीस शिपाई धायगुडे, पोलीस शिपाई पाटील, गायकवाड, कोठावळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजत टेलर, सहाय्यक फौजदार हरिश्‍चंद्र, शेडगे, पोलीस हवालदार केदार, साळुंके, मोरे, पोलीस शिपाई देसाई आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍याच्या दोन ते तीन टिमने सदगुरु परिसरात आरोपी महिलेचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना संशयित महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच तक्रारदाराच्या एका वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. तिच्या तावडीतून पोलिसांनी बळीत मुलीची सुटका केली. या मुलीला नंतर तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी महिलेच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यातून तिने या मुलीचे अपहरण केल्याचे बोलले जाते. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कुठलाही पुरावा अथवा माहिती उपलब्ध नसताना गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपी महिलेस अटक करुन तिच्या तावडीतून बळीत मुलीची सुटका केली. त्यामुळे या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍याचे पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी कौतुक केले होते.

चोरीचा २६ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल तक्रारदाराला परत
दुसर्‍या कारवाईत सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी जानेवारी महिन्यांत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील २६ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल तक्रारदारांना परत केला. त्यात २६ लाख १८ हजार ५०० रुपयांच्या १७५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह ५६ हजार ५०० रुपयांच्या कॅशचा समावेश आहे. चोरीचा बहुतांश मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदाराने रेल्वे पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

१७ जानेवारी २०२६ रोजी अभिषेक शिकरवार हा तरुण नागपूर-मुंबई असा विदर्भ एक्सप्रेसने प्रवास करत होता. नाशिक रेल्वे स्थानक आल्यानंतर तो झोपून गेला. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्याची बॅग चोरी करुन पलायन केले होते. या बॅगेत सोन्याचे विविध दागिने आणि कॅश असा लाखो रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोपान काकड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे, पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्‍विनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोनार, पोलीस हवालदार चव्हाण, खाडे, बिराजदार, नांगरे, बावीस्कर, पोलीस शिपाई कोळी, कोरडे, जाधव, ठाकरे, पाटील, गुन्हे शाखेचे हवालदार हितेश नाईक, लक्ष्मण बळकुंडे, प्रमोद दिघे, अक्षय चव्हाण, रविंद्र ठाकूर आदी पथकाने कोलकाता येथून जाहीर जमाल शेख या आरोपीस अटक केली. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून पोलिसांनी २६ लाख ७५ हजाराचे विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल हस्तगत केला होता. चोरीचा जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदार अभिषेक शिकरवार यांना परत करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page