हॉस्पिटलमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने डॉक्टरसह व्यावसायिकांना गंडा

पावणेतीन कोटीच्या फसवणुकीप्रकरणी डॉक्टर पती-पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – बोरिवली हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी सुरु असून हॉस्पिटलमध्ये गुंतवणुक केल्यास वार्षिक सहा टक्के परतावा आणि हॉस्पिटलच्या प्रॉफिटमधून पाच टक्के कमिशनचे गाजर दाखवून एका डॉक्टर पती-पत्नीने आठ डॉक्टर आणि एक व्यावसायिक अशा नऊजणांची सुमारे पावणेतीन कोटींना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टर पती-पत्नीसह तिघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता, महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबंधाचे संरक्षण आणि कंपनी अधिनिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. कांत जितेंद्र शाह, डॉ. नम्रता संतोष अग्रवाल आणि राजाराम रावजी रावराणे अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या तिघांकडे इतरांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केलीअसून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

४५ वर्षांच्या युलालिया जस्मीन जेरोम डिसोझा या डॉक्टर असून तिच्या पती आणि मुलांसोबत दहिसर येथे राहते. ती प्लास्टिक सर्जन म्हणून परिचित आहे. मार्च २०२३ रोजी तिच्या पतीचे मित्र अमीत गाला याांनी त्यांना कांत शाह आणि त्यांची पत्नी नम्रता अग्रवाल यांच्याविषयी माहिती दिली होती. ते दोघेही बोरिवली येथे हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एक हॉस्पिटल सुरु करणार असून त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे २५ लाखांची गुंतवणुक केलली आहे. या कंपनीचे दोन टक्के शेअर खरेदी केले आहे. त्यांना हॉस्पिटलसाठी गुंतवणुकदारांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक करावी अशी विनंती केली होती. याच दरम्यान त्यांनी त्यांची कांत शाह आणि नम्रता अग्रवालसोबत एक मिटींग घडवून आणली होती.

या भेटीत त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलसाठी गुंतवणुक केल्यास त्यांना कंपनीत शेअर होल्डर म्हणून घेण्याचे, गुंतवणुकीवर सहा टक्के परतावा तसेच हॉस्पिटलच्या प्रॉफिटमधून पाच टक्के कमिशन देण्याचे आश्‍वासन दिले होते. कंपनीचे एकूण ३७ लाख शेअर असून प्रत्येक शेअरची किंमत दहा रुपये आहे. ही ऑफर चांगली वाटल्याने जस्मीनने त्यांच्याकडे गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने कंपनीच्या शेअरसाठी साडेबारा लाखांची गुंतवणुक केली होती. त्यानंतर तिला शेअर सर्टिफिकेट देण्यात आले होते. या सर्टिफिकेटची पाहणी केल्यानंतर शेअरची किंमत दहा रुपये सांगण्यात आली होती, मात्र तिला ते शेअर ३४ रुपयाच्या दराने देण्यात आले होते. तिला त्यांनी ३६ हजार ७६४ शेअर दिले होते.

जुलै ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तिच्याप्रमाणे बालरोगतंज्ञ आनंद राणे, दर्शिनी भूषण पाटील, मूत्रविकारतंज्ञ शेषांग कामथ, अमीत गाला, व्यावसायिक मितेश मंदार तालिम, प्लास्टिक सर्जन संकेत सदानंद शेट्टी, सुरज नायर आणि भूलतंज्ञ कल्पेश शाह यांनी कंपनीत गुंतवणुक केली होती. कंपनीचे शेअर खरेदी केले होते. त्यापैकी आनंद राणे यांनी ४५ लाख ३७ हजार ५००, शेषांग कामथ यांनी १ कोटी २५ लाख, दर्शिनी पाटील, अमीत गाला यांनी प्रत्येकी २५ लाख, कल्पेश शाह यांनी १८ लाख २५ हजार, सुरज नायर आणि संकेत शेट्टी यांनी ६ लाख २५ हजार, युलालिया डिसोझा व मितेश तालिम यांनी प्रत्येकी १२ लाख ५० हजार रुपये असे एकूण २ कोटी ७६ हजार १२ हजार ५०० रुपये शेअरमध्ये गुंतवणुक केली होती.

ठरल्याप्रमाणे जून २०२३ रोजी बोरिवली हेल्थकेअर हॉस्पिटल सुरु झाले होते. त्यात कांत शाह आणि नम्रता अग्रवाल यांना संचालक दाखविण्यात आले होते. कंपनीचे दैनदिन कामकाज, प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहार तेच पाहत होते. कंपनीचे पार्टनर-शेअर होल्डर म्हणून त्यांना कुठलीही माहिती शेअर केली जात नव्हती. तसेच हॉस्पिटलच्या कुठल्याही प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहारात त्यांना समिल केले जात नव्हते. सर्वसाधारण सभेची एकदाही मिटींग घेतली नाही किंवा त्याची मिनिट बुकमध्ये नोंद केली नाही. गुंतवणुकीवर सहा टक्के परतावा तर प्रॉफिटमध्ये पाच टक्के कमिशनचे आश्‍वासन देऊन त्यांनी त्याचे आश्‍वासन पाळले नाही. इतक्या वर्षांत त्यांना कुठलाही परतावा किंवा प्रॉफिट दिला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर कांत शाह आणि नम्रता अग्रवाल यांनी हॉस्पिटलसाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले आहे.

या कर्जाची परतफेड होत असल्याने त्यांनी आतापर्यंत कोणालाही परतावा दिला नाही. मात्र बँकेतून किती रुपयांचे कर्ज घेतले, आतापर्यंत किती रुपयांची परतफेड केली, कर्ज कोणाच्या नावाने घेतले, हॉस्पिटलची जागा कोणाच्या नावावर आहे, बॅकेकडून घेतलेले कर्ज नेमके कशासाठी घेतले याबाबत काहीही माहिती दिली नाही. हा व्यवहारच संशयास्पद वाटल्याने युलालिया डिसोझासह इतर आठजणांनी त्यांच्या गुंतवणुक रक्कमेसह परतावा आणि कमिशनची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी कोणालाही परतावा आणि प्रॉफिटची रक्कम दिली नाही. त्यांनी दिलेल्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन समारे पावणेतीन कोटीचा अपहार करुन फसवणुक केली होती.

याकामी त्यांना राजाराम रावराणे याने मदत केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या तिन्ही आरोपीविरुद्ध युलालिया डिसोझा हिच्यासह इतर आठजणांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कांत शाह, नम्रता अग्रवाल आणि राजाराम रावराणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, महाराष्ट्र ठेवीदाराच्या, कंपनी अधिनियम कायदा कलमातर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संंबंधित तिन्ही आरोपींना लवकरच चोकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. या तिघांनी अशाच प्रकारे गुंतवणुकीच्या नावाने इतर व्यक्तींची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page