अनिल पंडितशी असलेल्या संबंधासह आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु
प्रांजल ठाकरानला ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – इंदौर येथे भावाच्या उपचारासाठी आलेला प्रांजल ठाकरान याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून सिनेअभिनेता टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत रविवारी दुपारी त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला शनिवार ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील मुख्य सूत्रधार अनिल पंडितचा तो जवळचा सहकारी असून त्याच्या नियमित संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्याशी असलेल्या संबंधासह गोळीबाराच्या आर्थिक व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
गेल्या रविवारी जुहू येथे टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्यानी वेगवेगळ्या राज्यातून आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली होती. त्यात तिन्ही शूटरसह त्यांना शस्त्रे पुरविणार्या दोन महिलांचा समावेश आहे. दहाही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून येणार्या माहितीनंतर इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेने इंदौर पोलिसांच्या मदतीने प्रांजलला शनिवारी अटक केली.
अटकेनंतर त्याला तेथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. ट्रान्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. त्याला घेऊन संबंधित पोलीस पथक मुंबईत आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. प्रांजल हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याने पानिपत येथे एका व्यापार्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात त्याच्याससोबत रेहान हादेखील सहभागी होता. गोळीबारानंतर पळून गेलेल्या या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती.
काही महिन्यांपूर्वीच ते दोघेही जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर प्रांजल हा अनिल पंडितच्या संपर्कात आला होता. त्याचे अनिलशी नियमित संभाषण सुरु होते. त्याने टायगर श्रॉफवर गोळीबाराची जबाबदारी प्रांजलवर सोपविली होती. त्यानंतर त्याने शूटरला शस्त्रांसह आर्थिक मदत केली होती. तो अनिलच्या कधीपासून संपर्कात होता. अनिलच्या सांगण्यावरुन त्याने इतर काही गुन्हे केले आहेत का, शस्त्रांसह पैशांची त्याने कशा प्रकारे व्यवस्था केली याचा तपास करणे आवश्यक असल्याने त्याच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. त्याला प्रांजलच्या वकिलांनी विरोध केला.
प्रांजल हा भावाच्या ट्रिटमेंटसाठी इंदौरला आला होता. तिथेच त्याला पोलिसांनी अटक केली. तीन दिवस ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. गोळीबाराच्या वेळेस तो तिथे उपस्थित नव्हता. या संपूर्ण कटात त्याचा सहभाग नव्हता असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने त्याला शनिवार ३१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.