मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मे २०२४
मुंबई, – मर्सिडिस कारच्या खरेदी-विक्रीचा दहा लाखांमध्ये व्यवहार करुन तीन दिवसांसाठी घेतलेल्या कारचा अपहार करुन पेमेंट न करता व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुद्दसीर सरोठिया ऊर्फ उणावाला आणि मेहबूब सरोठिया ऊर्फ उणावाला अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
धोबीतलाव येथे राहणार्या तक्रारदारांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. त्यांची मर्सिडिस बेन्झ ही कार असून आर्थिक अडचणीमुळे त्यांना कारची विक्री करायची होती. याच दरम्यान त्याची मुद्दसीरशी ओळख झाली होती. तो नागपाडा येथे राहत असून तो डेव्हल्परसह त्याचा कार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने ही कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन मॅकेनिकला कार दाखवतो असे सांगून कार घेतली होती. तीन दिवस उलटूनही त्याने कार परत केली नाही. पेमेंटसाठी बँक खात्याची माहिती घेतली, मात्र पेमेंट केले नाही. त्यामुळे ते त्याच्या नागपाडा येथील घरी गेले होते. यावेळी मुद्दसीरचे वडिल मेहबूब याने आम्ही तुझ्याकडून कार घेतली नाही, त्यामुळे पैसे मिळणार नाही. तुला काय करायचे आहे ते कर अशी धमकी देऊन पिटाळून लावले होते. चौकशीदरम्यान त्यांना त्यांची कार मुद्दसीर याने गावी पाठविली होती. टोलनाका येथे जाताना फास्ट टॅगमधून कार नेताना टोल टॅक्स वजा झाल्याचा त्यांना मॅसेज आला होता. या दोघांनी त्यांच्या कारची परस्पर विक्री करुन तक्रारदारांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मुद्दसीर आणि मेहबूब उणावाला यांच्याविरुद्ध नागपाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.