सिनेअभिनेत्यांना खंडणीसाठी धमकी देणारा आयटी इंजिनिअर निघाला

बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी खंडणीसाठी धमकी दिल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबारानंतर सिनेगृष्टीत भीतीचे वातावरण असताना सिनेअभिनेता तुषार कपूर, आयुषमान खुराणा यांना खंडणीसाठी धमकी देणार्‍या बंगलोरच्या एका आयटी इंजिनिअरला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. वैभव मिश्रा असे या आरोपी इंजिनिअरचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी काहीही संंबंध नाही. केेवळ दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्याने सिनेअभिनेत्यांना कोट्यवधी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने अनेक धक्कादायक गोष्टींचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर सिनेसृष्टीत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच गुन्ह्यांत तेरा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ते सर्वजण अनिल पंडित या लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित गुंडाच्या संपर्कात होते. त्याच्याच इशार्‍यावरुन त्यांनी हा गोळीबार केला होता, त्यामुळे बॉलीवूडमध्ये बिष्णोई टोळीबाबत प्रचंड भीतीचे वातवरण झाले होते. ही घटना ताजी असताना सिनेअभिनेता तुषार कपूर याला अज्ञात व्यक्तींकडून पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने तो लॉरेन्स बिष्णोईचा खास सहकारी हरी बॉक्सर असल्याचा दावा केला होता. मात्र त्याच्या आवाजाचे नमूने तपासल्यानंतर तो हरी बॉक्सर नसल्याचे उघडकीस आले होते.

या धमकीनंतर आयुषमान खुराणा यालाही अशाच प्रकारे खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर त्याने मुंबई पोलिसांना संपर्क साधून खंडणीसाठी धमकी येत असल्याची तक्रार केली होती. प्राथमिक तपासात कोणीतरी लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा वापर करुन बॉलीवूडच्या सिनेअभिनेत्यांना खंडणीसाठी धमकी देत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. तांत्रिक माहितीवरुन गुन्हे शाखेचे एक पथक बंगलोरला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने वैभव मिश्रा या ३० वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले होते.

वैभव हा बंगलोरच्या एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कामाला आहे. त्यानेच तुषार कपूर, आयुषमान खुराणा यांच्यासह इतर सेलिब्रिटींगना खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात येत आहे. वैभवचे लॉरेन्स बिष्णोईसह इतर कुठल्याही संघटित टोळीशी संबंध नाही. केवळ बॉलीवूडमध्ये दशहत निर्माण व्हावी या उद्देशाने त्याने खंडणीचे ऑडिओ पाठविले होते.

मात्र दहशत निर्माण करण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्यांना खंडणीसाठी धमकी देणे वैभव मिश्राला चांगलेच महागात पडले आहे. त्याला किल्ला कोर्टात हजर करुन त्याची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची पोलिसांकडून मागणी होणार आहे. त्याला तुषार कपूर, आयुषमान खुराणासह इतर कलाकारांचे फोन कोणी दिले, धमकी देण्यामागे दहशत हा उद्देश होता की त्यामागे त्याचा आणखीन उद्देश होता याचा पोलिसांकडून तपास होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page