खरेदीचा बहाणा पाच लाखांची सोनसाखळी चोरी करणारा गजाआड

गुन्हा दाखल होताच एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – सोन्याचे दागिने खरेदीचा बहाणा करुन पाच लाखांची सोनसाखळी चोरी करुन पळून गेलेल्या एका आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. सतीशकुमार कृष्णाप्रसाद केसरी असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा रहिवाशी आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर एक वर्षांनंतर त्याला चोरीच्या मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायलयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रिती दिपक साकरिया ही महिला कांदिवलीतील इराणीवाडीत राहत असून तिचे पती ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा कांदिवलीतील मथुरादास रोड, देवप्रयाग इमारतीमध्ये पद्मावती ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. अनेकदा तिच्या पतीला कामानिमित्त बाहेर जावे लागते, त्यावेळेस शॉपचे काम ती स्वत पाहत होती. १५ सप्टेब शॉप होती. रात्री आठ वाजता शॉपमध्ये एक व्यक्ती आला होता. त्याने तिच्याकडे सोनसाखळीची मागणी केली होती. यावेळी तिने त्याला एक सोनसाखळी दाखविली होती. ही सोनसाखळी घेतल्यानंतर तो दुकानातून पळून गेला होता. तिने आरडाओरड करुन त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. घडलेला प्रकार तिने तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर ते दोघेही कांदिवली पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे उपस्थित पोलिसांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.

याप्रकरणी प्रिती साकरिया हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी शॉपच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु केला होता. गेल्या एक वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेखर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गोर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ पार, महादेव नावगे, पोलीस हवालदार प्रविण जोपळे, राजेंद्र गौतम, कृष्णदेव केसर, पोलीस शिपाई स्वप्निल जोगलपुरे, प्रविण वाघमारे, आदित्य राणे आदी पथक दिल्लीत गेले होते.

या पथकाने तांत्रिक माहितीवरुन सतीशकुमार केसरी याला दिल्लीतील उत्तमनगर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली देताना चोरीची सोनसाखळी पोलिसांच्या स्वाधीन केली. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. सतीशकुमार हा दिल्लीतील द्वारका, उत्तमनगर, महेंद्र पार्कचा रहिवाशी असून गेल्या वर्षी तो सप्टेंबर महिन्यांत मुंबईत आला होता. यावेळी त्याने सोन्याचे दागिने खरेदी बहाणा करुन पाच लाखांची सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. अखेर एक वर्षांनी त्याला चोरीच्या सोनसाखळीसह पोलिसांनी शिताफीने अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page