डीमॅट खाते हॅक करुन शेअर विक्री करुन कोट्यवधी रुपयांची फसवणुक

कटातील मुख्य आरोपी महिलेस अटक करुन चार गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – डिमॅट खाते हॅक करुन शेअरची विक्री करुन त्याबदल्यात कमी किंमतीचे शेअर खरेदी करुन कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याच्या कटातील एका मुख्य आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. तिच्या अटकेने सांताक्रुज, अंधेरी आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या गुन्ह्यांतील विक्री केलेले २ कोटी ८६ लाख ७४ हजार ५४७ रुपयांचे शेअर गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.

यातील तक्रारदाराचा डिमॅट खाते असून या खात्यातून त्यांनी शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केल होती. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात सायबर ठगांनी इंटरनेट साधनांचा वापर करुन त्यांच्या डिमॅट खात्यात प्रवेश केला होता. त्यांच्या परवानीशिवाय त्यांचे युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करुन त्यांच्या डिमॅट खात्यातून ४ कोटी ५८ लाख ३४ हजार ५७९ रुपयांच्या परस्पर विक्री केली होती. या शेअर विक्रीनंतर या सायबर ठगांनी त्यामोबदल्यात त्यांच्या खात्यात १ कोटी ७१ लाख ६० हजार ३२ रुपयांचे कमी किंमतीचे पेन्नी स्टॉक खरेदी केले होते.

अशा प्रकारे त्यांच्या शेअरची परस्पर विक्री करुन अज्ञात सायबर ठगांनी त्यांच्या खात्यात कमी किंमतीचे शेअर जमा केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सायरस इराणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकातील फातिमा बागवान, पोलीस उपनिरीक्षक दिपेश शिंदे, पोलीस शिपाई अमेय शिंदे, महिला पोलीस शिपाई रेश्मा धुमाळ आदींने तपास सुरु केला होता.

तक्रारदारांच्या विक्री केलेल्या शेअरची माहिती काढून या पथकाने काही तासांत विक्री केलेले २ कोटी ८७ लाख ७४ हजार ५४७ रुपयांचे शेअर फ्रिज केले होते. ते शेअर नंतर त्यांच्या डिमॅट खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते. त्यानंतर या कटातील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना या कटातील मुख्य आरोपी महिलेस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिने तक्रारदाराच्या डिमॅट खात्याचे लॉगिंग करण्यासाठी ओटीपी मेलद्वारे प्राप्त झाला होता. त्यानंतर तिने त्यांच्या डिमॅट खात्यात प्रवेश करुन शेअरची परस्पर विक्री करुन ही फसवणुक केली होती.

तपासात आलेल्या या माहितीनंतर तिला बुधवारी पोलिसांनी अटक केली. तिच्या चौकशीतून तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले. तिच्या अटकेने सांताक्रुज येथील दोन तर अंधेरी व आझाद मैदान पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा चार फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page