एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक
एनसीबीची कारवाई; ७५ लाखांचा अर्धा किलो एमडी जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मे २०२४
मुंबई, – एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी अटक केली. एल. जी खान आणि यु. यु खान अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून या अधिकार्यांनी ७५ लाखाचे अर्धा किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. य दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. यातील यु. यु खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ड्रग्ज तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर बाहेर असल्याचे सांगण्यात आले.
बोरिवली येथे काहीजण एमडी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती मुंबई युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी एनसीबीच्या एका पथकाने बोरिवली रेल्वे स्थानकात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या एल. जी खान नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत या अधिकार्यांना ७५ लाख रुपयांचे ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याच्या चौकशीत यु. यु खान या व्यक्तीचे नाव समोर आले होते. तो एमडी ड्रग्जचा हँडलर असून माहीम परिसरात राहत असल्याचे समजले होते. त्यानंतर या पथकाने माहीम येथून यु. यु खान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. ते दोघेही एमडी ड्रग्ज सिडिंकेटचे सदस्य असून त्यांनी आतापर्यंत अनेकदा ड्रग्जची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. एल. जी खान हा कॅरिअर म्हणून काम करतो तर यु यु खान हा ड्रग्ज तस्करीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध ड्रग्ज तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. या प्रकरणात त्याचे नाव येऊ नये म्हणून तो गुप्तपणे ड्रग्जची तस्करी करत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो माहीम परिसरात स्वतचे नाव आणि अस्तिस्व बदलून राहत होता. त्याच्या चौकशीतून या सिंडीकेटची आणखीन काही माहिती मिळण्याची शक्यता या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.