५.५७ कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

प्रकल्पग्रस्तांसाठीच्या एसआरए फ्लॅटच्या आमिषाने ४७ लोकांना गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित असलेला च्या एसआरए फ्लॅट नावावर करुन देतो असे सांगून ४७ जणांना ५ कोटी ५७ लाखांना गंडा घालणार्‍या एका मुख्य वॉण्टेड आरोपीस निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. रुपेश राजाराम बेल्हनकर असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांत अटक झालेला रुपेश हा चौथा आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रुपेशला शैलेश संतोष काकण, अभिषेक गुज्जर आणि विश्‍वनाथ जाधव या तिघांनी मदत केल्याचे उघडकीस आले असून त्यांना सहआरोपी करण्यात आले होते. मुंबई शहरातील हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा एसआरए घोटाळा असल्याचे बोलले जाते.

आकाश राधेश्याम सोनी हे सांताक्रुज येथे राहत असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचा मित्र ऍग्नेलो परेरासोबत आस्था प्रायव्हेट प्रॉपटी नावाची पार्टनरशीपमध्ये कंपनी सुरु केली होती. ते दोघेही प्रॉपटी रुम खरेदी करुन विक्रीचे काम करत होते. सांताक्रुजच्या गोळीबार रोड, प्रगती मंडळ एसआरए सोसायटीमध्ये त्यांचे कार्यालय होते. त्यांचा परिचित रुपेश हा मित्र असून त्याला त्यांच्या कामाची माहिती होती. नोव्हेंबर २०१७ रोजी रुपेशने त्यांना त्याच्याकडे काही क्लाईंट असून ते एसआरए फ्लॅट खरेदीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्याचा शैलेश काकन नावाचा एक मित्र असून तो एसआरएची पीएपी रुम नावावर करुन देतो, त्याच्यासोबत एक मिटींग घेतल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे त्यांची वांद्रे येथे एक मिटींग झाली होती. या मिटींगमध्ये त्याने एसआरए कार्यालयात त्यांचे काही परिचित अधिकारी असून त्याांच्यामार्फत त्यांच्याकडे येणार्‍या क्लाईंटला रुम देत असल्याचा दावा केला. त्यांच्याकडे झोपडपट्टीधारक असल्याचे कुठलेही कागदपत्रे नाही. अशा लोकांना प्रकल्पग्रस्तासाठींच्या रुम एसआरएच्या पीएपी अंतर्गत देण्याबाबत चर्चा केली होती. याच दरम्यान त्यांनी आकाश आणि ऍग्नेलो यांची एसआरएशी संबंधित नरेश घाग, निवृत्त अधिकारी श्रीनिवास हेगडे, अभिषेक गुज्जर यांच्याशी ओळख करुन दिली होती. अंधेरी, सांताक्रुज, माटुंगा, वांद्रे आणि कांदिवली परिसरात एसआरएचे काही प्रोजेक्ट सुरु असून तिथेच इच्छुक लोकांना एसआरए फ्लॅटसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होते.

यावेळी त्यांच्यात अंधेरीतील सुदरलाल भटवाडी, जुना नागरदास रोड येथे २२ लाख, सांताक्रुज येथील वाकोला, अमृत मंथन २८ लाख, सांताक्रुजच्या कालिना, ब्लू मून सोसायटी १५ लाख, वांद्रे येथील बाजार रोड, न्यू फेरडन्स सोसायटी १६ लाख, कांदिवलीतील साईनगर, मंगलमय सोसायटी १८ लाख आणि माटुंगा भगत लेन, द्वारकामाई सोसायटीमध्ये २० लाखांमध्ये फ्लॅटची किमत ठरविण्यात आली होती. इच्छुक लोकांना एसआरए कार्यालयातून ताबा लेटर, ऍनेश्‍वर दोन, ऑर्डर कॉपी, रुमची चावी दिली जाईल. सर्व कागदपत्रे एसआरए अधिकारी मार्फत बनविले जाणार होते. त्यानंतर त्यांनी त्यांना ४७ लोकांची एक यादी सादर केली होती. या सर्वांना स्वस्तात एसआरए फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून फ्लॅटसाठी ५ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये घेण्यात आले होते. या संपूर्ण व्यवहार आकश सोनी यांच्या कंपनीच्या माध्यमातून होणार होता. इच्छुक लोकांकडून पैसे घेतल्यानंतर ती रक्कम आरोपींसह इतर खातेदारांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती.

मार्च २०२४ पर्यंत संबंधित् ४७ जणांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नव्हता. याबाबत विचारणा केल्यानंतर चारही आरोपींना त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकाविणयची धमकी दिली होती. या प्रकारानंतर आकाश सोनी यांनी एसआरएचे सेक्रेटरी संदीप देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी रुपेश, शैलेश, अभिषेक आणि विश्‍वनाथ यांच्यासोबत झालेल्या व्यवहाराची माहिती सांगून त्यांना ४७ लोकांना देण्यात आलेल्या एसआरएचे कागदपत्रे दाखविले होते. त्यात एसआरएच्या रुमचे ताबा लेटर, ऍनेश्वर दोन, ऑर्डर कॉपी, कलेक्टर लेटर, सक्षम पदाधिकारी यांचे पत्र, सीईओ-सेके्रटरी यांचे लेटर आदींचा समावेश होता. य कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर संदीप देशमुख यांनी संबंधित सर्व कागदपत्रे बोगस असून एसआरएकडून अशाच प्रकारे कोणालाही दस्तावेज देण्यात आले नाही असे सांगणयात आले.

एसआरएच्या पीएपींतर्गत स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून चारही आरोपींनी ४७ लोकांकडून ५ कोटी ५७ लाख रुपये घेतले होते. मात्र कोणालाही फ्लॅट दिला नाही, एसआरएचे बोगस दस्तावेज देऊन त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यामुळे आकाश सोनी यांनी निर्मलनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रुपेश बेल्हनकर, शैलेश काकन, अभिषेक गुज्जर आणि विश्‍वनाथ जाधव या चौघांविरुद्ध एसआरएचे बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटसाठी घेतलेल्या ५ कोटी ५७ कोटीचा अपहार करुन ४७ जणांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मुंबई शहरातील आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा एसआरए फ्लॅट घोटाळा होता. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. याच दरम्यान तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र रुपेश गुन्हा दाखल होताच पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या रुपेश बेल्हनकर याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page