४५ लाखांच्या हिर्यांचा अपहारप्रकरणी वॉण्टेड हिरे व्यापारी गजाआड
गेल्या अकरा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ४५ लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक करुन पळून गेलेल्या भाविका डायमंड कंपनीच्या वॉण्टेड हिरे व्यापार्याला बीकेसी पोलिसांनी अटक केली. धनराज पृथ्वीराज जैन असे या हिरे व्यापार्याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच धनराज हा गेल्या अकरा महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने अशाच प्रकारे इतर हिरे व्यापार्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
योगेश धीरजलाल कामदार हे वसई परिसरात राहत असून वांद्रे येथील बीकेसी, जोधानी ब्रदर्स या हिरे व्यवसायाशी संबंधित कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. ही कंपनी हिर्याच्या खरेदी-विक्रीचे काम करत असून कंपनीने योगेश कामदार यांना हिरे विक्रीचे सर्व अधिकार दिले आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांची अनेक हिरे व्यापार्यांशी चांगली ओळख झाली होती. त्यात भाविका डायमंड कंपनीचे धनराज जैन याचाही समावेश असून ते दोघेही एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखतात. त्यांच्या कंपनीने धनराज जैन यांच्या कंपनीला अनेकदा हिरे दिले होते. त्यांनीही या हिर्यांचे पेमेंट दिलेल्या वेळेत दिले होते, त्यामुळे त्यांच्यावर कंपनीचा विश्वास होता.
नोव्हेंबर महिन्यांत धनराज हे त्यांच्या कार्यालयात आले होते. त्याने त्याच्याकडे एक चांगली ग्राहक कंपनी असल्याचे सांगून त्यांच्याकडून क्रेडिटवर ६५ कॅरेटचे सुमारे ४५ लाखांचे हिरे घेतले होते. त्यांच्यावर विश्वास असल्याने योगेश कामदार यांनी त्यांना क्रेडिटवर हिरे दिले होते. यावेळी धनराजने पंधरा दिवसांत हिर्यांचे पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक ते दिड महिना उलटूनही त्याने पेमेंट केले नाही. याबाबत धनराजला संपर्क साधण्याा प्रयत्न केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता.
चौकशीअंती धनराजने अशाच प्रकारे अनेक हिरे व्यापार्याकडून हिरे घेतले होते, मात्र कोणालाही पेमेंट न करता त्यांची फसवणुक करुन पलायन केल्याचे समजले. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने योगेश कामदार यांनी बीकेसी पोलिसांत धनराज जैनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध हिर्यांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या धनराज जैनला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांचा अपहार करुन आतापर्यंत अनेक हिरे व्यापार्यांना गंडा घातल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.