मोदीजीकडून मोफत धान्य मिळत असल्याची बतावणी फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड दोघांना तीन महिन्यानंतर अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – मोदीजीकडून गरीबांना मोफत धान्य मिळत असल्याची बतावणी करुन एका वयोवृद्ध महिलेचे मंगळसूत्रासह कॅश असा सुमारे ५३ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या दोन वॉण्टेड आरोपींना कुरार पोलिसांनी अटक केली. प्रकाश लोभाजी काथे आणि अब्दुल अन्वर अब्दुल मोहीज शेख अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असल्याने त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

६७ वर्षांची सुशीला वामन मोरे ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहते. ती घरकाम तर तिचा मुलगा मजुरीचे काम करतो. ७ ऑगस्टला दुपारी तीन वाजता ती मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी गेली होती. सामान घेतल्यानंतर ती तिच्या घराच्या दिशेने जात होती. पठाणवाडी, पॅराडाईज इमारतीसमोरील किंग वडापाव दुकानाजवळून जाताना तिच्याकडे एक अज्ञात व्यक्ती आला. त्याने मावशी मोदीजीकडून गरीबांना मोफत धान्य आले आहे, तुम्हाला मोफत धान्य मिळवून देतो असे सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून ती त्याच्यासोबत मोफत धान्य घेण्यासाठी गेली होती. काही वेळानंतर त्याने तिला एका बाकावर बसविले.

याच दरम्यान तिथे दुसरा व्यक्ती आला. त्याने त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवा. नाहीतर तिला मोफत धान्य मिळणार नाही. तुम्हाला कोणीही गरीब समजणार नाही असे सांगितले. त्यामुळे तिने तिचे मंगळसूत्र तिच्या पर्समध्ये ठेवले होते. यावेळी या दोघांनी तिला बोलण्यात गुंतवून तिच्याकडील पर्स घेऊन पलायन केले होते. या पर्समध्ये तिचे सोन्याचे मंगळसूत्र आणि तीन हजाराची कॅश होती. दुसरीकडे बराच वेळ पाहून ते दोघेही मोफत धान्य घेऊन आले नाही. त्यामुळे कंटाळून ती घरी जाण्यासाठी निघाली होती. यावेळी तिने पर्सची पाहणी केली असता पिशवीत तिची पर्स नव्हती.

मोफत धान्य देतो असे सांगून या दोघांनी गोड बोलून तिच्याकडील सोन्यांचे मंगळसूत्रासह तीन हजाराची कॅश असा ५३ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यानंतर तिने घडलेला प्रकार कुरार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा करताना त्यांनी मोदीजीकडून मोफत धान्य मिळत असल्याचे सांगून वयोवृद्धेची फसवणुक केली होती, त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश कुरार पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी प्रकाश काथे आणि अब्दुल शेख या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच तक्रारदार वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.दोन्ही आरोपी सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page