सलमान खान फायरिंगप्रकरणी गुन्हे शाखेची हरियाणात कारवाई
वॉण्टेड असलेल्या सहाव्या आरोपीस अटक व पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ एप्रिल २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील झालेल्या फायरिंगप्रकरणी गुन्हे शाखेने हरियाणा येथे कारवाई करुन सहाव्या आरोपीस अटक केली. हरपाल सिंग असे या ३४ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत मंगळवारी त्याला मोक्का कोर्टाने बुधवार २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सलमानच्या घराजवळ रेकी करण्याचे आदेश हरपालने दिले होते. तसेच मारेकर्याना आर्थिक मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हरपाल हा बिष्णोई टोळीचा अत्यंत महत्त्वाचा सहकारी समजला जात असून त्याच्या अटकेने बिष्णोई टोळीचे अनेक गुपित बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यापैकी एका आरोपीने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ १४ एप्रिलला दोन बाईकस्वारांनी फायरिंग केले होते. फायरिंगनंतर दोन्ही आरोपी बाईकवरुन पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सुरतच्या भूज आणि पंजाब येथून चार आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन आणि सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याचा समावेश होता. सोनूकुमारने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर इतर तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या चौघांच्या अटकेनंतर गेल्या आठवड्यात राजस्थान येथून मोहम्मद रफिक चौधरी याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याच चौकशीतून हरपाल सिंग याचे नाव समोर आले होते.
हरपाल हा हरियाणातील फतेहबादचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे एक पथक तिथे रवाना झाले होते. सोमवारी रात्री उशिरा त्याला त्याच्या गावातील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याला अटक करुन नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. तपासात हरपाल हा लॉरेन्स आणि अनमोल बिष्णोई यांच्या संपर्कात होता. त्यांच्याकडून मिळालेले आदेश तो मोहम्मद रफिकच्या माध्यमातून इतर आरोपींना देत होता. त्यानेच त्यांना सलमानच्या घराची रेकी करण्यास सांगितले होते. त्यासाठी त्याने त्यांना दोन ते तीन लाख रुपये पाठविले होते. तो बिष्णोई टोळीचा अत्यंत महत्त्वाचा सहकारी समजला जातो. त्यामुळे त्याच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होणार आहे. मुंबईत आणल्यानंतर हरपालवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला मोक्का न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.