सात लाखांचे पर्सनल कर्ज घेऊन बजाज फायनान्सची फसवणुक
बोगस दस्तावेज सादर करुन कर्ज घेतल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, (प्रतिनिधी) – सात लाखांचे पर्सनल कर्ज घेऊन बजाज फायनान्स कंपनीची एका भामट्याने फसवणुक केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने आलेल्या तक्रार अर्जानंतर पवई पोलिसांनी रंजन किसनचंद भाटिया या भामट्यविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. बोगस दस्तावेज सादर करुन रंजनने पर्सनल कर्ज घेतल्याचे तपासात उघडकीस आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोरेगावचा रहिवाशी असलेला ३० वर्षीय रवी युवराज मोरे हा बजाज फायानान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. या कंपनीचे एक मुख्य कार्यालय गोरेगाव येथील विरवानी इंडस्ट्रियल इस्टेट, बिझनेस पार्कमध्ये आहे. १९ मार्च २०२२ रोजी त्याच्या कंपनीत रंजन भाटिया याने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्याने त्याचे पॅनकार्ड, आधारकार्ड, एका खाजगी नोकरीचे नियुक्तीपत्र, विमा पॉलिसीचे कागदपत्रे आदी दस्तावेज सादर केले होते. या दस्तावेजाची पडताळणी केल्यानंतर तो सात लाख रुपयांच्या पर्सनल लोनसाठी पात्र असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या बँक खात्यात कर्जाची सात लाखांची रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली होती.
सप्टेंबर २०२३ पर्यंत त्याने कंपनीने दिलेल्या कर्जाचे नियमित हप्ते भरले होते, नंतर कर्जाचे हप्ते भरणे बंद केल्यानंतर कंपनीचे कर्ज वसुली विभागाचे गुरुचरण सिंग यांनी त्याच्या पंजाब येथील पत्त्यावर जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्याच्या आईची त्यांची भेट झाली. यावेळी तिचा मुलगा सुरींदरकुमार भाटिया हा पंजाबच्या मोहाली येथे नोकरीस असून त्याने त्यांच्या कंपनीतून कुठलेही पर्सनल कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान रंजनने सुरींदर भाटिया या नावाने बोगस दस्तावेज सादर करुन कर्जासाठी अर्ज करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने रवी मोरे यांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रंजन भाटिया याच्याविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.