आंतरराष्ट्रीय विमानतळासह ताज हॉटेलमध्ये बॉम्बची अफवा

कॉल उत्तरप्रदेशातून आल्याचे उघड; पोलिसांकडून तपास सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मे २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या कॉलमुळे एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण ताज हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. प्राथमिक तपासात हा कॉल उत्तरप्रदेशातून आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला सोमवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. आंतरराष्ट्रीय विमानतळासह ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. त्याचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल, सतर्क रहा असे सांगून त्याने कॉल कट केला होता. ही माहिती नंतर कंट्रोल रुममधून वरिष्ठांना देण्यात आली होती. या कॉलची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक नाशक पथकासह श्‍वान पथकाला संपूर्ण परिसरात तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांनी श्‍वान पथकासह बॉम्बशोधक पथकासोबत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलची तपासणी सुरु केली होती. मात्र तिथे पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस येताच संबंधित पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात हा कॉल उत्तरप्रदेशातून आल्याचे उघडकीस आले आहे. कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्तीने मोबाईल बंद ठेवला आहे. त्यामुळे आरोपीच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांची एक टिम लवकरच उत्तरप्रदेशला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात विविध ठिकाणी बॉम्बच्या अफवांची मालिका सुरु आहे. थट्टामस्करी म्हणून बोगस कॉल करणार्‍या व्यक्तींची संख्या दिवसदिवस वाढत असून त्याचा प्रचंड ताण मुंबई पोलिसांवर पडत आहे. त्यामुळे अशा प्रकारे बोगस कॉल करणार्‍याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करुन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page