व्हिसासाठी घेतलेल्या ७९ लाखांचा अपहार करुन फसवणुक
महिला व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ जुलै २०२४
मुंबई, – व्हिसासाठी घेतलेल्या सुमारे ७९ लाखांचा अपहार करुन बंगलोरच्या एका महिला व्यावसायिकासह दोघांची सुमारे ७९ लाखांची फसवणुक झाल्याचा मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ऍसिल ट्रॅव्हेल्स कंपनीचा मालक दिव्येश पटेल याच्याविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सुनायना जगननादम पेरुरी ही महिला मूळची बंगलोरची रहिवाशी आहे. तिचा राईट चॉईस कॅरिअर ऍडव्हायजर ओपीसी लिमिटेड नावाची व्हिसा कनस्लंटिंगचा व्यवसाय आहे. ती युरोप, कॅनडा देशात जाणार्या लोकांना व्हिसा देण्याचे काम करते. त्यासाठी तिला संबंधित ग्राहकांकडून लिगल फी म्हणून मानधन दिले जाते. नोव्हेबर २०१९ तिला एका खाजगी वेबसाईटवर मालाडच्या लिंक रोड, काचपाडा, जयवंती अलाईड बिझनेस सेंेटरची एक जाहिरात दिसली होती. या कंपनीचा दिव्येश पटेल हा मालक असून तोदेखील व्हिसाचे काम करत होता. त्यामुळे तिने त्याला फोन करुन त्याच्याकडे व्हिसाच्या कामाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने एका व्हिसामागे तो तीन लाख रुपये घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तिच्याकडे येणार्या सर्व व्हिसाचे काम दिव्येशकडे देण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत आल्यानंतर तिने दिव्येशची भेट घेतली होती. त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्यात व्हिसा कामाबाबत एक करार झाला होता.
२ मे २०२० ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत तिच्या कंपनीकडून ६२ लोकांचे व्हिसा बनवून देण्याचे काम आले होते. ते काम तिने दिव्येशला दिले होते. त्यासाठी तिने त्याच्या बँक खात्यात ७८ हजार १० हजार तर त्याच्या सांगण्यावरुन त्याच्या कंपनीतील कर्मचारी योगेश पटेल याच्या बँक खात्यात १४ लाख रुपये असे ९२ लाख १० हजार ट्रान्स्फर केले होते. ऑक्टोंबर-डिसेंबर २०२१ या कालावधीत त्याने तीन लोकांचे कॅनडा देशाचे व्हिसा मंजुर झाल्याचे सांगितले. व्हिसाचे कागदपत्रे आल्यानंतर तिला तो व्हिसा वर्क नसून व्हिझीट व्हिसा असल्याचे दिसून आले. मूळात व्हिझीट व्हिसा घेताना तिची परवानगी घेणे आवश्यक होते, मात्र तशी कुठलीही मंजुरी न घेता त्याने व्हिझीट व्हिसा मिळविला होता. त्यामुळे तिने दिव्येशकडे विचारणा केली होती. मात्र त्याने तिला टाळण्याचा प्रयत्न केला. त्याने दिलेल्या व्हिसावर विदेशात गेलेल्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते, त्याच व्हिसा रद्द करुन त्याला पुन्हा भारतात पाठविण्यात आले होते. दिव्येशने बोगस कागदपत्रे सादर करुन व्हिसा मिळविल्याने या प्रवाशाला तीन वर्षांसाठी कॅनडामध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याने तिच्याविरुद्ध तेथील लोकल कोर्टात एक केस फाईल केली होती.
दुसरीकडे दिव्येशने उर्वरित लोकांचे व्हिसाचे काम पूर्ण केले नव्हते. त्यामुळे तिने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी दिव्येशने तिला १९ लाख ३४ हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रक्कम वारंवार मागणी करुनही परत केली नाही. त्याने तिला आठ पोस्ट डेटेड चेक दिले होते, मात्र ते सर्व चेक बँकेत न वटत परत आले होते. याच दरम्यान तिला अन्य एका व्यक्तीला तिच्या मुलीसाठी स्टुंडट व्हिसा देतो असे सांगून त्याची साडेसहा लाखांची फसवणुक केली होती. अशा प्रकारे त्याने व्हिसाच्या कामासाठी घेतलेल्या सुमारे ७९ लाखांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिच्यासह संबंधित व्यक्तीने दिव्येशविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.