मालवणीतील कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी
पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल; दोन वर्षांत अकरा लाखांची खंडणी वसुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मालाडच्या मालवणीतील एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी पिता-पूत्रांविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. झाकीर हुसैन सय्यद ऊर्फ झाकीर डॉट कॉम, आमीरअली झाकीर सय्यद, उमेद झाकीर सय्यद अशी या तिघांची नावे आहेत. दोन वर्षांत या तिघांनी तक्रारदार व्यावसायिकाकडून सुमारे अकरा लाख रुपयांची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सलीम मोहम्मद गौस शेख हा त्याच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. पूर्वी तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता. मात्र कोरोनामुळे त्याचे काम बंद झाले होते. त्यामुळे त्याने जानेवारी २०२१ पासून बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरु केला होता. चाळीच्या बांधकामाची दुरुस्ती करणे, छोट्या रुम बांधणे असे कंत्राट घेऊन दोन वर्षांत त्याने स्वतचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून त्याला मालवणी परिसरात अनेक लहान मोठे काम मिळत होते. याच दरम्यान जानेवारी २०२१ रोजी त्याला झाकीर सय्यदचा फोन आला होता. यावेळी त्याने त्याच्या परिसरात बांधकाम करताना त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. बांधकाम करायचे असेल तर त्याला हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाहीतर त्याला तिथे काम करता येणार नाही अशी धमकी दिली होती. त्यामुळे तो झाकीरला भेटण्यासाठी बीएमसी कॉलनी गेटजवळ भेटला होता. यावेळी झाकीरने त्याच्याकडे खंडणीची मागणी करताना ती रक्कम दिली नाहीतर त्याला मालवणीसह इतर कुठेही काम करता येणार नाही अशी धमकी दिली होती.
व्यवसाय वाढत असल्याने त्याने झाकीरशी वैर नको म्हणून त्याला ऑनलाईन पंधरा हजार पाठविले होते. त्यानंतर तो आणि त्याचे दोन्ही मुले आमीरअली आणि उमेद हे दोघेही त्याला सतत खंडणीसाठी धमकी देत होते. पैसे देण्यास उशीर झाल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत खोट्या तक्रारी करण्याची धमकी देत होते. जानेवारी २०२२ रोजी त्याने उधयकुमार गणेशन याच्या घराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ते काम सुरु असताना तिथे झाकीर व त्याचे दोन्ही मुले आले आणि त्यांनी पैशांची मागणी सुरु केली. पैसे दिले नाहीतर त्यांना तिथे काम करता येणार नाही अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी सुरु केलेले काम बंद केले होते. त्यानंतर सलीमने त्यांना ५० हजार रुपये दिल्यानंतर ते काम पुन्हा सुरु झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सलीम शेख याच्याकडे काहीच काम नव्हते. तरीही ते तिघेही त्यांना खंडणीसाठी सतत धमकी देत होते. जिवाच्या भीतीने त्यांनी पुन्हा त्यांना पैसे पाठविले होते.
अशा प्रकारे जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत त्याने त्यांना खंडणी स्वरुपात अकरा लाख चौदा हजार रुपये पाठविले होते. तरीही त्यांच्याकडून सतत धमकी येत असल्याने त्याने मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांची भेट घेतली. त्यांना घडलेला प्रकार सांगून तिथे झाकीरसह त्याचे दोन मुले आमीरअली आणि उमेद यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला गुन्हा दाखल करुन संबंधित पिता-पूत्राविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सलीम शेखच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध कट रचून खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.