काजू-मैदा-लंवग व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक
चार व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – काजू-मेदा-लवंब आयात-निर्यात व्यवसायात गुंतवणुकीवर चांगले कमिशन देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची चार व्यापार्यांनी सुमारे ३३ लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन चारही व्यापार्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अरविंद प्रेमजी ठक्कर, प्रकाश वेलजी गणात्रा, संदीप महेंद्र ठक्कर आणि हार्दिक दिलीप गणात्रा अशी या चौघांची नावे असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांना लाखो रुपयांना गुंतवणुकीच्या गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विपुल मथुरादास ठक्कर (५७) हे माटुंगा येथे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांची विश्वेश्वर इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून ही कंपनी अन्नधान्य आयात-निर्यात करत होती. कोरोना काळात ते आजारी पडले आणि त्यांचा व्यवसाय बंद पडला होता. फेब्रुवारी २०२३ रोजी ते गुजरात येथे कस्टमने जप्त केलेली साखर खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांची अरविंद ठक्करशी ओळख झाली होती. त्याने त्यांना त्याच्या परिचित काही मैदा, लवंग आणि काजूचे व्यापारी असून त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक करा. त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याच संदर्भात बोलणी करण्यासाठी ते अरविंदला भेटण्यासाठी वाशी येथे गेले होते. तिथे त्याने त्यांची ओळख प्रकाश गणात्रा या व्यापार्याशी करुन दिली. त्याने त्यांना गुजरात येथून तेरा हजार मैदा असलेली गाडी येणार आहे. या मैदा खरेदीत त्यांनी गुंतवणुक केल्यास प्रत्येक गाडीमागे त्यांना १६ हजार २५० रुपये कमिशन मिळेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याच्या व्यवसायात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना कमिशनची रक्कम दिली. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासह इतर व्यापार्यांच्या व्यवसायात ३८ लाख ६१ हजार ९७१ रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यानंतर त्यांना १७ लाख ४ हजार रुपये कमिशनसह परत करण्यात आले होते. मात्र उर्वरित २० लाख ५६ हजार ९९५ रुपये परत केले नव्हते. अशा प्रकारे संदीप ठक्कर आणि हार्दिक गणात्रा यांच्याकडून त्यांना काजूच्या व्यवहारात गुंतवणुक केलेली रक्कम परत देण्यात आली नव्हती. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी या चौघांची चौकशी सुरु केली होती. या चौकशीदरम्यान त्यांना या चौघांनी इतर व्यापार्यांना गुंतवणुकीच्या नावाने लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. अशा प्रकारे या चौघांनी जून ते जुलै २०२३ या कालावधीत गुंतवणुकीच्या नावाने ३३ लाख ५६ हजार ९९५ रुपयांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अरविंद ठक्कर, प्रकाश गणात्रा, संदीप ठक्कर आणि हार्दिक गणात्रा या चौघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांच्या अटकेने अशाच फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.