मुलुंड येथे हिट ऍण्ड रनच्या घटनेने रहिवाशांमध्ये शोककळा

बीएमडब्ल्यू कारने दोघांना उडविले; एका तरुणाचा मृत्यू

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मुलुंड येथे शनिवारी पहाटे हिट ऍण्ड रनच्या घटना घडली. भरवेगात जाणार्‍या एका बीएमडब्ल्यूने जाहिरात लावणार्‍या दोन तरुणांना धडक दिली. त्यात प्रितम थोरात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर प्रसाद पाटील हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर वीर सावरकर या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातानंतर बीएमडब्ल्यू कारचा चालक जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. पळून गेलेल्या शक्ती अलगला ऊर्फ शॉन या आरोपी चालकाला खारघर येथून काही तासांत पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध नवघर पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्‍याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रितम आणि प्रसाद पाटील हे दोघेही मुलुंडचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते होते, त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रितमच्या अपघाती निधनाने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.

हा अपघात शनिवारी पहाटे चार वाजता मुलुंडच्या ९० फिटवर, दान विजय सोसायटीसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अनुराग संजीव सुर्वे हा मुलुंड परिसरात राहत असून त्याचा स्वतचा अँक्रेलिक बोर्डचा व्यवसाय आहे. मुलुंडच्या गव्हाणपाडा, वासुदेव बळवंत फडके मार्गाच्या मुलुंडचा राजा या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे तो कार्यकर्ता आहे. त्याच्यासह त्याचे इतर मित्र आणि सहकारी संबंधित मंडळाचे कार्यकर्ते असून ते दरवर्षी गणेशोत्साच्या काळात सजावटीसाठी मदत करतात. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत अनुरागसह त्याचे मित्र मंडपात सजावट करत होते. दुसर्‍या दिवशी पहाटे तीन वाजता तो त्याच्या मित्रासोबत कारमध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी आनंदनगर,चेकनाक्याजवळ गेले होते. गॅस भरुन ते सर्वजण साडेतीन वाजता परत गव्हाणपाडा, दान विजय सोसायटीसमोर आले होते. चार वाजता त्यांचे मित्र प्रितम थोरात आणि प्रसाद पाटील हे रस्त्यावर स्क्रॅप होल्डिंग शिडीवरुन चढून जाहिरातीचा गेट लावत होते. याच दरम्यान तेथून भरवेगात जाणार्‍या एका बीएमडब्ल्यू कारने जाहिरातीचा गेट लावणार्‍या दोन्ही मित्रांच्या शिडीला जोरात धडक दिली. त्यात ते दोघेही शिडीवरुन खाली पडल्याने गंभीररीत्या जखमी झाले होते. यावेळी अनुरागसह इतरांनी या कारचालकाचा पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. दुसरीकडे अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या दोन्ही मित्रांना त्यांनी तातडीने वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्रितम थोरातला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर प्रसाद पाटीलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी अनुराग सुर्वे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बीएमडब्ल्यू कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्‍या गंभीररीत्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच शक्ती हरविंदर अलगला या चालकाला काही तासांत पोलिसांनी अटक केली. शक्ती हा मुलुंडचा रहिवाशी असून एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. शक्तीने अलीकडेच त्याची कार दुरुस्त केली होती. कारची टेस्ट ड्रायव्हिंग करताना त्याने कार भरवेगात चालविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अपघातानंतर त्याने कार घराजवळ पार्क केली होती. त्यानंतर तो बाईकने नवी मुंबईला पळून गेला होता. अखेर त्याला खारघर येथून पोलिसांनी अटक केली.
कारच्या धडकेने तरुणाचा मृत्यू तर दोनजण जखमी
रविवारी दुपारी झालेल्या दुसर्‍या अपघातात आयुष कैलास सिंह या २० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र शिवम कमलेश सिंह आणि विशाल प्रेमबहादूर सिंह हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. या दोघांवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत आणि जखमी वरळीचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ना. म जोशी मार्ग पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करुन कारचा चालक मनिष चंद्रभान सिंग याला अटक केली. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजता लोअर परेल येथील नवीन ब्रिज, मातुल्य नाका सिग्नल चौकाजवळ झाला. आयुष हा त्याच्या दोन मित्रांसोबत बाईकवरुन जात होता. दुपारी दोन वाजता ही बाईक मातुल्य नाका सिग्नल चौकात उजव्या बाजूने वळत घेत होती. यावेळी एका कारने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. या अपघातात ते तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या तिन्ही तरुणांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आयुष सिंग याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर दोघांवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अपघाताची नोंद होताच आरोपी मनिष सिंग या २५ वर्षांच्या चालकाला पोलिसांनी अटक केली. तो कुर्ला येथे राहत असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दोघांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page