चौकशीसाठी समन्स पाठवून दहा लाखांची लाचेची मागणी
पोलीस निरीक्षकासह दोघांवर गुन्हा तर लाच घेताना खाजगी व्यक्तीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – माटुंगा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत संशयित तक्रारदाराला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवून त्याच्याकडे एका खाजगी व्यक्तीच्या मदतीने दहा लाख रुपयांची लाचेची मागणी करणे एका पोलीस निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकणी माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगबर पगार आणि खाजगी जयमीन सावलिया या दोघांविरुद्ध गुजरातच्या राजकोट विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत जयमीनला तक्रारदाराकडून दहा लाखांची लाचेची रक्कम घेताना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. दिगंबर पगार यांची लवकरच संबंधित पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी माटुंगा पोलीस ठाण्यात एका फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांचा तपासाचे आदेश वरिष्ठांकडून पोलीस निरीक्षक दिगंबर पगार यांना देण्यात आला होता. याच गुन्ह्यांत तक्रारदारांचा सहभाग उघडकीस आला होता. संबंधित तक्रारदार गुजरातच्या राजकोटचे रहिवाशी असून त्यांना माटुंगा पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. ही नोटीस त्यांच्या राहत्या घरी पाठविण्यात आली होती. ही नोटीसमुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहणे बंधनकारक होते. याच दरम्यान जयमीन सावलिया याने तक्रारदारांना संपर्क साधून पोलीस निरीक्षक दिगंबर पगार हे त्यांच्या ओळखीचे व परिचित असून या नोटीसबाबत घाबरण्याचे काहीही कारण नाही. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांचे फोनवरुन बोलणे दिगंबर पगार यांच्याकडून करुन दिले होते. यावेळी त्यांनी त्यांचा या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगितले. अटक न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी करुन ती रक्कम जयमीन सावलिया यांच्याकडे देण्यास सांगितले होते. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी राजकोट लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक दिगंबर पगार आणि खाजगी व्यक्ती जयमीन सावलिया यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकार्यांनी राजकोटच्या रेसकोर्स, चहा पोस्ट दुकानात सापळा लावून लाचेची दहा लाख रुपयांची रक्कम घेताना जयमीन सावलिया याला रंगेहाथ पकडले. ही रक्कम घेतल्यांनतर जयमीनने दिगंबर पगार यांना संपर्क साधला होता. त्यामुळे जयमीनला लाचप्रकरणी अटक करुन या गुन्ह्यांत दिगंबर पगार यांना सहआरोपी करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध राजकोट लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल झाल्याने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. याच गुन्ह्यांत लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.