भरन्यायालयात धिंगाणा घालणार्‍या डॉक्ट महिलेविरुद्ध गुन्हा

मुलुंड येथील स्थानिक न्यायालयातील घटनेने एकच खळबळ

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, (प्रतिनिधी) – आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याचे आदेश देण्याची विनंती करत एका डॉक्टर महिलेने भरन्यायालयात आरडाओरड करुन प्रचंड धिंगाणा घातल्याचा प्रकार मुलुंडच्या स्थानिक न्यायालयात घडला. या घटनेने तिथे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली होती. न्यायालयात धिंगाणा घालून न्यायालयीन कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ. विनिता बियानी हिच्याविरुद्ध मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दखलपात्र गुन्ह्यांसाठी याचिका करणार्‍या या डॉक्टर महिलेला भरन्यायालयात धिंगाणा घालणे चांगलेच महागात पडले आहे.

सविता अरुण फणसे या डोंबिवली येथे राहत असून मुलुंड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक मुलुंड येथील स्थानिक न्यायालयात कोर्ट कारकून म्हणून आहे. बुधवारी सायकाळी साडेचार वाजता त्यांच्या न्यायालयात एका खटल्याच्या आरोपीच्या जामिन अर्जावरील सुनावणी सुरु होती. ही सुनावणी सुरु असताना तिथे विनिता बियानी आली. तिने न्यायाधिशांना तुम्ही मला मंगळवारची तारीख दिली होती. तुम्ही रजेवर गेला होता, त्यामुळे त्यांनी तिला तिच्या याचिकेवर एफआयआर घेण्याचे आजच आदेश जारी करण्याची विनंती केली होती. मात्र न्यायाधिशांनी तिला ते कामात असून तुमच्या केसच्या तारखेला या, त्यावेळेस तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे सांगितले. मात्र तिचे समाधान झाले नव्हते.

काही वेळानंतर तिने भरन्यायालयातच आरडाओरड करुन तिथे धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करुन न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे न्यायाधिशांनी तिला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सविता फणसे यांनी विनिता बियानी हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मुलुंड पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयीन कामकाज सुरु असताना तिथे गोंधळ घालून न्यायालयीन कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page