पार्टटाईम जॉंबची ऑफर देत २४ लाखांची ऑनलाईन फसवणुक

फसवणुक करणार्‍या ठगाचा सायबर सेल पोलिसांकडून शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, – गुगलवर विविध उत्पादनांना रेटींग देण्याच्या पार्टटाईम जॉंबची ऑफर देत एका ४२ वर्षांच्या बेरोजगार व्यक्तीची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे २४ लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

४३ वर्षांचे अमीत अरुण भट हे अंधेरीतील चकाला परिसरात राहतात. ते एका खाजगी कंपनीत कामाला होते. सध्या ते बेरोजगार आहेत. १७ डिसेंबरला त्यांना एका अज्ञात महिलेचा फोन आला होता. तिने ती एका खाजगी कंपनीत कामाला असून त्यांना पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. त्यामुळे त्यांनी तिला होकार दिला होता. त्यांना गुगलवर विविध उत्पादनांना रेटींग देण्याचे काम देऊन दिवसाला तीन ते आठ हजार रुपये कमिशन मिळतील असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे त्यांनी रेटींग देऊन त्याचे स्क्रिनशॉट तिला पाठविले होते. याच दरम्यान तिने त्यांना एक लिंक पाठवून त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती देण्यास सांगितली. त्यामुळे त्यांनी तिने पाठविलेल्या लिंकवरतंची माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांच्या खात्यात कमिशनची रक्कम येऊ लागली. फ्री टास्कनंतर त्यांना सिता शर्मा नावाच्या एका महिलेने प्रिपेड टास्कद्वारे जास्त कमिशनचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांना आधी काही रक्कम जमा करावी लागणार होती.

तिच्यावर विश्‍वास ठेवून १८ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत त्यांनी विविध प्रिपेड टास्कसाठी सुमारे २४ लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर त्यांना कुठलेही कमिशन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी संबंधिताकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी पैसे काढण्यासाठी तांत्रिक अडचण येत असल्याचे सांगून त्यांच्याच पैशांसाठी त्यांना ऍडव्हॉस टॅक्स म्हणून पावणेबारा लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला.

अशा प्रकारे तन्वी, सिता शर्मा, भावेश नावाच्या सायबर ठगांनी पार्टटाईम जॉंबची ऑफर देताना कॉईन स्विच एक्सचेंज या क्रिप्टो एक्सचेंजच्या नावाने बोगस लिंक आणि लेटरवर पैसे भरण्यास प्रवृत्त त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांना ही माहिती सांगितली होती. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध कट रचून बोगस दस्तावेजाच्या आधारे फसवणुक करणे या भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page