मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – प्रवासादरम्यान गर्दीत मिसळून मोबाईल चोरी करणार्या एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका दुकलीस पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून चोरीचे सतरा मोबाईलसह गुन्ह्यांतील रिक्षा जप्त केली आहे. या आरोपीविरुद्ध मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुल्तान अब्दुल कयुम खान आणि रमजान कल्लन अली अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विक्रम जयसिंग राठोड हा तरुण कुलाबा परिसरात राहतो. १० ऑक्टोंबरला रात्री साडेनऊ वाजता तो अंधेरी येथून बसने प्रवास करत होता. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्याचा मोटोरोला कंपनीचा पंधरा हजाराचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्याने एमआयडीसी पोलिसात तक्रार केली होती. मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद, पोलीस हवालदार बडे, पोलीस शिपाई जाधव, लोखंडे, अवघडे, शिंदे यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या सुल्तान खान आणि रमजान अली या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून या मोबाईलसह इतर गुन्ह्यांतील सोळा चोरीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. ही टोळी गुन्ह्यांत रिक्षाचा वापर करत असल्याने ही रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. तपासात सुल्तान हा मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मोबाईल चोरी करुन तो रिक्षचालक रमजानच्या रिक्षातून पळून जात होते. या गुन्ह्यांत इतर दोघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा ही टोळी मोबाईल चोरी करुन पलायन करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.