मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – स्वस्तात सोने देण्याची बतावणी करुन एका वकिलाची सुमारे सव्वापाच लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी हार्दिक चंद्रकांत सिंग ऊर्फ सिंग या २८ वर्षांच्या आरोपी दहिसर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभागउघडकीस आला असून या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीने बोगस सोने देऊन सुमारे सव्वापाच लाख रुपये पलायन केले होते.
३१ वर्षांचे तक्रारदार वकिल असून सांताक्रुज येथे राहतात. ते मुंबई उच्च न्यायालयात प्रक्टीस करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना सोशल साईटवर रमेश पटेल या ज्वेलर्स व्यापार्याची प्रोफाईल दिसली. तो स्वस्तात सोने विक्री करत असल्याचा दावा करत होता. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधला होता. यावेळी रमेशने त्यांना ७ लाख २० हजार रुपयांचे शंभर ग्रॅम सोने ५ लाख २० लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ते सोने खरेदीसाठी तयार झाले होते. त्याने त्यांना दहिसर येथे बोलावून राहुल हा त्यांना सोने देईल, त्याच्याकडे पेमेंट करण्याची विनंती केली होती. ठरल्याप्रमाणे १८ सप्टेंबरला सायंकाळी ते दहिसर मेट्रो स्टेशनजवळ आले होते. यावेळी तिथे राहुलसह अन्य एक तरुण आला. त्यांनी त्यांच्याकडून ५ लाख २० हजार रुपये घेतले आणि त्यांना शंभर ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे बिस्कीट दिले होते.
सोन्याच्या शुद्धतेची खात्री करण्यासाठी ते राहुलसोबत तनिष्क ज्वेलर्समध्ये जाण्यासाठी निघाले. मात्र काही अंतर गेल्यानंतर राहुल हा त्याच्या दुसर्या सहकार्यासोबत बाईकवरुन पळून गेला. त्यांनी त्याच्यासह रमेश पटेलला संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तनिष्क ज्वेलर्समध्ये जाऊन त्यांनी सोन्याची पडताळणी केली असता ते बिस्कीट पितळ असून ५६ ग्रॅम वजनाचे असल्याचे उघडकीस आले. स्वस्तात सोने देण्याची बतावणी करुन या तिघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपींचा शोध सुरु असताना तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी हार्दिक सिंग याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.