मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – गस्त घालणार्या पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी साई भास्कर गायकवाड या ३६ वर्षांच्या आरोपीस साकिनाका पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दत्तात्रय शिवाजी बाठे हे पोलीस हवालदार असून सध्या साकिनाका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजता ते त्यांच्या सहकार्यांसोबत परिसरात गस्त घालत होते. मारवा रोडवरील आंबेडकरनगर, पिकनिक हॉटेलबाहेर एक तरुण संशयास्पद फिरत होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी हटकले असता त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवीगाळ करुन इथून निघून जा, नाहीतर बाटलीने एकेकाचे डोके फोडून देईल अशी धमकी देत पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत तो साई गायकवाड असून अंधेरीतील पाईपलाईन, आंबेडकर चाळीतील रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन धमकी देणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.