तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीसह स्वतच्या मुलीचा विनयभंग
पवई-विलेपार्ले येथील घटना; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीसह स्वतच्याच सोळा वर्षांच्या मुलीचा तिच्याच पित्याने दारुच्या नशेत विनयभंग केल्याचा प्रकार पवई आणि विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विलेपार्ले आणि पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी पित्यासह दोन्ही आरोपी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या तिघांनाही विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
पहिल्या गुन्ह्यांतील १६ वर्षांची बळीत मुलगी विलेपार्ले राहत असून ४५ वर्षांचा आरोपी तिचा पिता आहे. त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने तिची आई दहा वर्षांपासून वेगळी राहते. आरोपीला दारु पिण्याचे व्यसन होते. २१ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने स्वतच्या सोळा वर्षांच्या मुलीशी दारुच्या नशेत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्याच्याकडून होणार्या मानसिक शोषणाला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी विलेपार्ले पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
दुसरी घटना पवई परिसरात घडली. बळीत मुलगी पवई परिसरात तिच्या पालकांसोबत राहत असून याच परिसरातील एका खाजगी शाळेत ती शिकते. दोन्ही आरोपीही याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या एक महिन्यांपासून ही मुलगी शाळेत जाताना आणि शाळेतून येताना ते दोघेही तिचा पाठलाग करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. ३१ ऑक्टोंबरला रात्री सव्वानऊ वाजता ही पवईतील तुंगा गाव परिसरातून जात होती. यावेळी या दोघांनी तिला पकडून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे ती घाबरुन घरी आली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. या घटनेनंतर ते सर्वजण पवई पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.