२.६७ कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी महिलेसह दोघांना अटक

दोन्ही आरोपी ग्राहक सेवा पुरविणार्‍या कंपनीचे कर्मचारी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – विदेशातून आणलेले २ कोटी ६७ लाख रुपयांचे सोने विमानतळाबाहेर आणण्याचा प्रयत्नात असलेल्या एका महिलेसह दोघांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दोन्ही आरोपी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ग्राहक सेवा पुरविणार्‍या कंपनीचे कर्मचारी आहेत. या दोघांवर सोने तस्करीप्रकरणी कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

विदेशातून आणलेले सोने विमानतळावर बाहेर आणून सोने तस्करी करणार्‍या आरोपींना मदत करणारी एक टोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. विमानतळावर काम करत असल्याने या कर्मचार्‍यांची चौकशी किंवा तपासणी होत नव्हती. त्याचा फायदा संबंधित कर्मचारी घेत होते. या माहितीनंतर अशा कर्मचार्‍यांविरुद्ध या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अलीकडेच या दोघांनाही विमानाच्या टाकाऊ कार्टमध्ये काही सोने सापडले होते. ते सोने संबंधित अधिकार्‍यांच्या ताब्यात न देता त्यांनी ते सोने विमानतळाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला या महिलेला या अघिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्याकडून या अधिकार्‍यांनी ३३५० ग्रॅम वजनाचे पेस्ट स्वरुपातील सोने जप्त केले. तिच्या चौकशीतून दुसर्‍या कर्मचार्‍याचे नाव समोर आले होते. त्यानंतर ग्राऊंड हॅडलिंग कर्मचारी असलेल्या आरोपीला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ते दोघेही त्यांच्या एअरोड्रोम एंट्री परमिटचा वापर न करता ते सोने विमानतळाबाहेर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न संबंधित अधिकार्‍यांनी हाणून पाडला आणि त्यांच्याकडून २ कोटी ६७ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page