लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैगिंक अत्याचार

प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल; दोनदा गर्भपात केला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ डिसेंबर २०२४
मुंबई, – लग्नाचे आमिष दाखवून एका २८ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी नसीर नहीम शाह या २७ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी भान्यास कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपीने तिचा दोन वेळा गर्भपात केल्याचे तपासात उघडकीस आले. गुन्हा दाखल होण्यापूर्वी नसीर हा पळून गेल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

पिडीत तरुणी ही मालाड परिसरात राहत असून दोन वर्षांपूर्वी तिची नसीरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिनेही त्यास होकार दिला होता. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अंधेरीतील पश्‍चित दुतग्रती महामार्ग, पंपहाऊस सबवेजवळील एका हॉटेलमध्ये अनेकदा तिच्या मनाविरुद्ध लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती दोन वेळा गरोदर राहिली होती. यावेळी त्याने तिला दोन वेळा गर्भपात करण्यास प्रवृत्त केले होते. गेल्या काही दिवसांपासून ती त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होती, मात्र तो विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. शारीरिक संबंधासाठी नसीरने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच तिने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नसीर शाह याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर मेघवाडी पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. नसीर हा बोरिवली येथे राहत असून त्याचा सलूनचा व्यवसाय आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page