बोरिवलीतील व्यावसायिकाच्या घरी घरफोडी

चार तासांत २३ लाखांचा मुद्देमाल पळविला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – बोरिवलीतील एका व्यावसायिकाच्या घरात अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करुन सुमारे २३ लाखांचे विविध सोन्याचे दागिने आणि चांदीचे भांडी असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी सायंकाळी सात वाजता गेलेले व्यावसायिक कुटुंबिय रात्री एक वाजता घरी येईपर्यंत चोरट्यांनी संपूर्ण घरातील सफाई केली होती. अवघ्या चार तासांत सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेत आहेत.

ही घटना ४ जानेवारी सायंकाळी सात ते रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बोरिवलीतील विजय सेल्समागील हरि ओम अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंटच्या रुम क्रमांक ६०३ मध्ये हेमल योगेश भट हे व्यावसायिक त्यांचया आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांची स्वतची प्रिटींग प्रेस आहे. घरात लग्नकार्य असल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांनी बँकेच्या लॉकरमधून काही सोन्याचे दागिने आणले होते. ते दागिने त्यांनी बेडरुमच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते. शनिवारी ४ जानेवारीला त्यांच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस होता. त्यामुळे भट कुटुंबिय अंधेरी येथे जेवणासह पार्टीसाठी गेले होते.

सायंकाळी सात वाजता घरातून गेल्यानंतर ते रात्री उशिरा एक वाजता घरी आले होते. यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून त्यांच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता. या चोरट्याने कपाटातील विविध सोन्याचे दागिने, सोन्याचे कॉईन, दिड किलो चांदीचे भांडी असा सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. रात्री उशिरा एक वाजता ते घरी आले असता त्यांना त्यांच्या फ्लॅट दरवाजा आणि आतील सर्व लाईट चालू असल्याचे दिसून आले. त्यांनी बेडरुमची पाहणी केल्यानंतर कपाटातील सर्व दागिने आणि चांदीचे भांडी चोरट्याने पळवून नेल्याचे दिसले. या घटनेनंतर त्यांनी बोरिवली पोलिसांना ही माहिती दिली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हेमल भट यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या हेमल भट यांच्या घरी अवघ्या चार तासांत चोरट्याने प्रवेश करुन सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page