मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कोस्टल रोडवरील अपघातात गार्गी चाटे या १९ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला. भरवेगात कार चालविण्याचा प्रयत्नात कार पलटी होऊन हा अपघात झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी संयम सकाला या आरोपी मित्राविरुद्ध ताडदेव पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून मैत्रिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संयम हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. कोस्टल रोडवरील अपघाती मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
हा अपघात शनिवारी सायंकाळी गिरगावच्या दिशेने जाणार्या ताडदेवच्या हाजीअली, अमर सन्सच्या दक्षिण वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गार्गी चाटे ही तरुणी मूळची नाशिकची रहिवाशी आहे. ती सध्या शिक्षणासाठी मुंबईत आली होती. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. शनिवारी ती तिचा मित्र संयम सकाला याच्यासोबत प्रभादेवी येथून गिरगावच्या दिशेने जात होती. त्यांची स्विफ्ट कार कोस्टलवरुन जात होती. ही कार हाजीअलीतील अमर सन्स, दक्षिण वाहिनीवरुन जात होती. यावेळी भरवेगात कार चालविण्याचा प्रयत्नात संयमचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कारला डिवायडरला धडक दिली. त्यात ती कार पलटी होऊन ते दोघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने बिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे गार्गीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर संयम याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी संयमविरुद्ध पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.