वैद्यकीय चाचणीने केला दत्तक मुलीच्या प्रक्रियेचा पर्दाफाश
जन्मदात्या मातेसह दत्तक घेणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2025
मुंबई, – वाढती महागाईने घरचे बिघडलेले अर्थगणित, पती व्यसनाचा गेलेला आहारी आणि त्यात ती गर्भवती राहिली. प्रसुती झाली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्मानंतर मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिने तिच्या मैत्रिणीला मुलीला देण्याचा धाडसी निर्णय घेतला. नऊ महिने पाोटात वाढवलेला हा रक्तामांसाचा गोळा पतीच्या व्यसनधीनते आणि अन्य कारणामुळे तिच्या मैत्रिणीला ते मुल दिले. त्यासाठी जन्माचा बोगस दाखलाही तयार केला. मुलगी आजारी पडल्यावर तिला तिची वैद्यकीय चाचणी केली. वैद्यकीय चाचणी अहवालात तिला गंभीर आजाराची लागण झाल्याचे समोर आले. तेव्हा मूल दत्तक घेण्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार समजताच भोईवाडा पोलिसांनाही धक्का बसला. अखेर जन्मदात्या मातेसह दत्तक घेणार्या महिलेविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
श्रद्धा संतोष नारकर या सायन येथे राहत असून सध्या महिलाबाल विकासमध्ये चाईल्ड हेल्पलाईनमध्ये केंद्र समन्वयक म्हणून काम करतात. 21 फेब्रुवारीला त्यांना सखी केंद्राच्या मेलवरुन मुंबई शहरासाठी एक मेल प्राप्त झाला होता. त्यात परळच्या जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये चार महिन्यांचे एक नवजात मुलगी अॅडमिट असून तिला मुमताज (नावात बदल) नावाची एक महिला घेऊन आली होती. तिने ती मुलगी दत्तक घेतल्याचे सांगून तिच्याकडे मुलीच्या दत्तक घेतल्याचे कुठलेही कागदपत्रे नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यात या मुलीचा 11 ऑक्टोंबर 2024 रोजी केईएम हॉस्पिटलमध्ये जन्म झाला होता. या जन्माचा दाखला मुमताजकडे होता. ती कल्याण येथे राहत असून याच परिसरात शबाना (नावात बदल) ही महिला राहते.
काही महिन्यांपूर्वी या दोघींची ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्या दोघीही चांगल्या मैत्रिण झाल्या होत्या. त्यावेळेस शबाना ही सहा महिन्यांची गरोदर होती. तिच्या पतीला मद्यप्राशन करण्याचे व्यसन होते. त्यामुळे तिला ते बाळ नको होते. त्यामुळे मुमताजने शबानाच्या प्रसुतीनंतर तिचे बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोंबर महिन्यांत मुमताजला प्रसुतीसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिने एका मुलीला जन्म दिला होता. त्यावेळेस तिने तिचे नाव मुमताज असल्याचे सांगितले. त्यासाठी तिने पुरावा म्हणून तिचा आधारकार्ड दिला होता. हा प्रकार हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आला नाही. त्यामुळे मुलीचा जन्माचा दाखला माहिरा मुमताज (नावात बदल) असे देण्यात आले होते.
याच दरम्यान या बाळाची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ती माहिराला घेऊन 28 जानेवारीला परळच्या जेरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये आली होती. तिथे माहिराला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला अपेंडिसचे निदान झाले होते. त्यामुळे तिच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते. याच दरम्यान या बाळाला एचआयव्हीची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगून ती मुलगी तिची नसून ती शबानाकडून दत्तक घेतल्याचे सांगितले. त्यानंतर ती माहिती सखी केंद्राकडून महिला बाल विकास आणि भोईवाडा पोलिसांना देण्यात आली होती.
या घटनेनंतर शबानाच्या घरी संबंधित कर्मचारी गेले होते. यावेळी त्यांना शबाना तेथून निघून गेल्याचे समजले. अशा प्रकारे मुमताजने बोगस दस्तावेज बनवून शबानाकडून तिची मुलगी दत्तक घेतले. तसेच शबानाने स्वतच्या मुलीचा सांभाळ न करा तिला मुमजातच्या स्वाधीन करुन पलायन केले होते. या दोघांनी संगनमत करुन बेकायदेशीरपणे मुलगी दत्तक घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर या दोघींविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.