पार्किंगसाठी पैशांची मागणी करणार्या दुकलीस अटक
पैसे दिले नाही म्हणून टेम्पो पेटवून जिवे मारण्याची धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2025
मुंबई, – पार्किंगसाठी स्थानिक वाहनचालकांकडून पैशांची मागणी करणार्या एका दुकलीस पवई पोलिसांनी अटक केली. शाहरुख फिरोज खान आणि शाहिद निहामद उल्ला खान अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खंडणीसह अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत फिरोज आणि रिहान अशा दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पार्किंगचे पैसे दिले नाही म्हणून या टोळीने एका टेम्पोचालकासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांचा टेम्पोच पेटवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रकाश तुकाराम आयरे हा 38 वर्षांचा तक्रारदार चालक म्हणून काम करत असून सध्या पवईतील मिलिंदनगर, सिद्धीविनायक सोसायटीमध्ये राहतो. रविवारी पहाटे चार वाजता तो त्याच्या मालकीचा टेम्पो सिद्धीविनायक सोसायटीजवळ पार्क करत होता. यावेळी तिथे आरोपी आले आणि त्यांनी त्याच्याकडे टेम्पो पार्किंगसाठी पैशांची मागणी केली होती. त्याने पैसे देण्यास नकार दिला असता त्यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या टेम्पोचे नुकसान करुन टेम्पोला आग लावून पेटवून दिले होते.
हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी तिथे जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी प्रकाश आयरे व त्याच्या कुटुंबियांना आरोपींनी शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्या मदतीसाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांना चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. वाहनांची पार्किंग करायची असेल तर पैसे द्यावे लागतील नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन ते सर्वजण पळून गेले होते.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रकाश आयरे याच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध खंडणीसह अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या शाहरुख खान आणि शाहिद खान या दोघांना पोलिसांनी अटक केली तर फिरोज आणि रिहान हे दोघेही पळून गेले होते. अटकेनंतर या दोघांनाही सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.