स्ट्रॉबेरी हरितगृह प्रोजेक्टसाठी घेतलेल्या 6.40 कोटीचा अपहार
एकाच कुटुंबातील सदस्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2025
मुंबई, – स्ट्रॉबेरी हरितगृह प्रोजेक्टसाठी घेतलेल्या सहा कोटी चाळीस लाख रुपयांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील सदस्याविरुद्ध सहार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात वरुण चेतन धु्रव, प्रतिक चेतन धु्रव, चेतन रसिकलाल ध्रुव, इतर ध्रुव कुटुंबियांसह अन्य आरोपींचा समावेश आहे. प्रोजेक्ट पूर्ण न करता गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा ध्रुव कुटुंबिय वैयक्तिक कारणासाठी वापर करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या सर्वांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.
विवेक किशोर डिडवानिया हे मालाड येथील अप्पर गोविंदनगर, धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत असून व्यवसायाने व्यावसायिक आहे. धु्रव कुटुंबिय त्यांच्या परिचित असून 2021 रोजी त्यांच्यात स्ट्रॉबेरी हरीतगृह व्यवसाय करण्याबाबत एक मिटींग झालीहोती. या व्यवसायात चांगला फायदा असल्याने धु्रव कुटुंबियांनी त्यांना या व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना चार कोटीची कॅश आणि दोन कोटी चाळीस लाख आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर केली होती. हा संपूर्ण व्यवहार 1 सप्टेंबर 2021 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत अंधेरीतील साकिनाका, मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटच्या आरोपींच्या खाजगी कार्यालयात झाला होता.
मात्र ध्रुव कुटुंबियांनी ठरलेल्या वेळेस स्ट्रॉबेरी हरितगृह प्रोजेक्टचा प्रकल्प पूर्ण केला नाही. या प्रोजेक्टसाठी आश्वयक नसताना त्यांनी त्यांच्याकडून जास्त रक्कम गुंतवणुकीसाठी घेतली होती. या पैशांचा वैयक्तिक कारणासाठी वापर करुन सहा कोटी चाळीस लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र दिड ते दोन वर्ष उलटूनही त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ध्रुव कुटुंबियांविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसाकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात ध्रुव कुटुंबियांनी स्ट्रॉबेरी हरितगृह प्रोजेक्टसाठी विवेक डिडवानिया यांच्याकडून सहा कोटी चाळीस लाख रुपये घेऊन प्रोजेक्ट पूर्ण न करता त्यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर वरुण, प्रतिक, चेतन आणि इतर ध्रुव कुटुंबियासह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.