मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – विदेशातून आणलेल्या कोकेन व सोने तस्करीचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत चार प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक करुन त्यांच्याकडून 23 कोटी 32 लाख रुपयांच्या सोने आणि कोकेनचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या चारही प्रवाशांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
सोने-ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्यानंतर सीमा शुल्क विभागाने अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बुधवारी दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे 21 विदेशी मुद्रा असलेले सोन्याचे बार आणि एक कट पीस सोने सापडले. 21 किलो 288 ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत 18 कोटी 92 लाख रुपये इतकी आहेत. ते सोने त्यांनी बेल्ट आणि शर्टमध्ये लपवून आणले होते. सोने तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल होताच या दोन्ही प्रवाशांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यापूर्वी या अधिकार्यांनी अशाच प्रकारे दोन प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून 11 कोटीचे कोकेनसह 40 लाखांचे सोने जप्त केले होते.
तीन दिवसापूर्वी युगांडा देशाचा नागरिक हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याला प्रवास तपशील आणि मुंबई भेटी बाबत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने विचारले. त्याने काही उत्तरे दिली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याची कसून चौकशी केली. कसून चौकशी केल्यावर त्याने पोटात कोकेन च्या कॅप्सूल ठेवल्याचे सांगितले. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या पोटातून १०० कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढल्या. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे ११ कोटी रुपये इतकी आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला.
परदेशातील तस्कर हे तस्करीसाठी महिला सोबत आता वृद्धाचा देखील वापर करू लागले आह. दोन दिवसापूर्वी एक वृद्ध हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्या वृद्ध प्रवाशाकडे चौकशी केली. त्याने गरम कपड्यात लपवलेली ४० लाख रुपये किमतीचे सोन्याची पावडर जप्त केली. सीमा शुल्क विभागाने त्या वृद्धाचा जबाब नोंदवून घेतला.