मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – फ्लॅटसाठी बुकींग करताना दिलेल्या 61 लाखांचा अपहार करुन फ्लॅटचे रजिस्ट्रेशन न करता एका व्यक्तीची फसवणुक केल्याप्रकरणी विक्रम परमार या बिल्डरविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विक्रम परमार याने त्याच्या विलेपार्ले येथील इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये अशाच प्रकारे इतर लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
49 वर्षांचे तक्रारदार सांताकुज येथे राहत असून ते कॉम्प्युटर डिझायगि म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची त्यांच्या मित्रामार्फत विक्रम परमारशी ओळख झाली होती. विक्रम हा बिल्डर असून त्याचे विलेपार्ले येथे एका इमारतीच्या प्रोजेक्ट काम सुरु होते. या बांधकाम साईटची पाहणी केल्यानंतर त्यांनी तिथे एक फ्लॅट बुक केला होता. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅटची किंमत 2 कोटी 67 लाख, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन व सोसायटी चार्जेस असे मिळून तीन कोटी तीन लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला फ्लॅटसाठी 61 लाखांचे पेमेंट केले होते.
मात्र एक महिन्यांत रजिस्ट्रेशनचे आश्वासन देऊन त्याने फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नव्हते. मनपाकडून अद्याप सीसी प्राप्त झाली नाही असे व इतर कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याने मनपाकडून सर्व परवानगी प्राप्त झाले सऊन त्यांच्याकडून आणखीन 48 लाखांची मागणी केली होती, मात्र त्यांनी रजिस्ट्रेशनशिवाय उर्वरित पैसे देणार नाही असा पवित्रा घेतला होता. दिलेल्या मुदतीत त्याने रजिस्ट्रेशन न केल्याने त्यांनी त्यांच्यातील करार रद्द करुन त्याला वकिलामार्फत एक नोटीस पाठवून पैशांची मागणी केली होती.
मात्र त्याने पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात विक्रम परमार याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या 61 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. विक्रमने फ्लॅटच्या नावाने इतर काही लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.