ट्रिपच्या नावाने 73 डॉक्टरांची दोन कोटीची फसवणुक

मुख्य आयोजकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – बाकू शहरात डॉक्टरांसाठी आयोजित केलेल्या ट्रिपसाठी दोन कोटी रुपये घेऊन एका ठगाने 73 डॉक्टरांची फसवणुक केल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रिपचा मुख्य आयोजक शरद हेगडे याच्याविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच शरद हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

36 वर्षांचे तक्रारदार रोहन प्रदीप पालशेतकर हे व्यवसायाने डॉक्टर असून ते प्रभादेवी परिसरात राहतात. ते स्त्रीरोग तंज्ञ असून नवी मुंबईतील डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये प्रॅक्ट्रीस करतात तर त्यांचा ऑपेरा हाऊस परिसरात पालशेतकर नावाचे एक खाजगी क्लिनिक आहे. त्यांच्यासह त्यांच्या परिचित डॉक्टरांची एक संघटना असून ही संघटना अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवितात. अनेकदा त्यांचे वैयक्तिक व कौटुंबिक ट्रिपचे आयोजन केले जाते. 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या संघटनेची पवई येथे एक मिटींग झाली होती. त्यात जवळपास दोनशेहून अधिक डॉक्टर उपस्थित् होते. तिथेच त्यांची शरद हेगडे याच्याशी ओळख झाली होती. त्याने तो विदेशात ट्रिप आयोजित करतो असे सांगून त्यांच्या संघटनेच्या डॉक्टरांसाठी बाकू शहरात ट्रिपचे आयोजन करतो असे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने आयोजित केलेल्या काही ट्रिपचे फोटो दाखविले होते.

कमीत कमी खर्चात ट्रिपचे आयोजन करत असल्याने अनेकांनी बाकू शहरात ट्रिपला जाण्याचा निर्णय घेतला होता. सात दिवसांच्या ट्रिपसाठी व्हिसा, प्रवास, हॉटेल, जेवण आदीसाठी त्याने प्रत्येकी दिड लाखाचा बजेट दिला होता. त्यामुळे त्यांनी ही माहिती त्यांच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये शेअर करुन जास्तीत जास्त डॉक्टरांनी ट्रिपमध्ये सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले होते. ठरल्याप्रमाणे रोहन पालशेतकर यांनी त्याला 1 लाख 11 हजार 330 रुपये पाठविले तर इतर 72 डॉक्टरांनी 2 कोटी 13 लाख 66 हजार 106 रुपये असे 2 कोटी 14 लाख 77 हजार 436 रुपये शरद हेगडे याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते.

मात्र त्याने ट्रिपचे आयोजन कले नाही. ट्रिपचे आयोजन करण्यास विलंब झाल्याने त्याने सर्वांचे पैसे परत करतो असे सांगून तेरा लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित दोन कोटीचा परस्पर अपहार करुन तक्रारदारासह इतर डॉक्टरांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून शरद हेगडे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शरद हेगडे याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीनंतर शरद हेगडे हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page