दोन दिवसात मुंबईतील पाकिस्तानी नागरिकांची घरवापसी होणार
मुंबईत 14 तर राज्यात 5023 नागरिक; 107 बेपत्ता असल्याची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 एपिल 2025
मुंबई, – जम्मू-काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत सर्वच राज्यांना त्यांच्या राज्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना नोटीस देऊन त्यांच्या मायदेशात पाठविण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर मुंबईसह राज्य पोलीस दलाने गंभीर दखल घेत मुंबईसह राज्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकाना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या पाकिस्तानी नागरिकांची घरवापसी होणार आहे. सध्या मुंबई शहरात 14 तर राज्यात 5023 पाकिस्तानी नागरिक राहत असून त्यापैकी 107 नागरिक बेपत्ता असल्याची नोंद आहे. या बेपत्ता पाक नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुप्तचर विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र शासनाने सर्वच राज्यांना सध्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती काढून त्यांना नोटीस देऊन त्यांच्या देशात जाण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची सध्या मुंबईसह राज्य पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरु आहे. स्वत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवसीस यांनी मुंबईसह सर्व शहर पोलीस आयुक्तांना अशा पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर सध्या मुंबईसह राज्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती काढून त्यांना नोटीस देण्याचे काम सुरु आहे.
मुंबई शहरात सध्या चौदा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहे. त्यांचे नातेवाईक मुंबईत राहत असल्याने ते त्यांना भेटण्यासाठी टुरिस्ट व्हिसावर मुंबईत आले होते. या सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती काढून त्यांना शनिवारी नोटीस देण्यात आली होती. आतापर्यंत बारा नागरिकांना ही नोटीस देण्यात आली असून उर्वरित दोघांना रविवारी नोटीस दिली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत त्यांना देश सोडून मायदेशात जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. दुसरीकडे राज्यात पाच हजार तेवीस नागरिक राहत असल्याची नोंद होती. त्यापैकी एकशे सात नागरिक बेपत्ता आहेत. त्यांची माहिती पोलिसांना नसून या नागरिकांचा स्थानिक पोलिसांसह गुप्तचर विभागाकडून शोध सुरु आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांनाही लवकरच पाकिस्तानात पाठविण्यात येणार आहे.