ठाण्यातील स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
दोन महिलांसह तिघांना अटक तर सात महिलांची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 एपिल 2025
ठाणे, – ठाण्यातील एका स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी सात महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर या सर्व महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ठाण्यातील कासारवडवली, घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉलजवळ अमारा वेलनेस अॅण्ड हिलनेस नावाचा एक स्पा आहे. तिथे स्पाच्या नावाने काम करणार्या महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एका बोगस ग्राहाकाच्या माध्यमातून पोलिसांनी त्याची शहानिशा केली होती. बोगस ग्राहकाने तिथे सेक्स रॅकेट असल्याचा सिग्नल दिला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, कदम, पोलीस उपनिरीक्षक एन. डी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के वालगुडे, पोलीस हवालदार व्ही. आर पाटील, के. बी पाटील, आर. यू सुवारे, महिला अंमलदार पी. जी खरात, एच. आर थोरात, के. एम चांदेकर, चालक अंमलदार यु. एम घाडगे यांनी तिथे छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांनी सात महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीतून स्पाचा मालक-चालक आणि व्यवस्थापक तिथे काम करणार्या महिलांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे उघडकीस आले. या माहितीनंतर स्पामधील तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यात दोन महिलासह एका पुरुषाचा समावेश होता. ते तिघेही तिथे दलाल म्हणून काम करत होते. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना स्पामध्ये सर्व्हिस दिली होती. त्यांच्याकडून मिळालेली रक्कम संबंधित महिलेला दिल्यानंतर उर्वरित रक्कम ते स्वतजवळ ठेवत होते. अटकेनंतर या तिघांनाही शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या सातही महिलांना मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते, मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.