घाटकोपर येथे 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2025
मुंबई, – घाटकोपर येथे एका तेरा वर्षांच्या मुलाचे आपल्या राहत्या घरातील पोटमाळ्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संध्या उमेश सोनावणे या महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मानसिक शोषण करुन बघून घेण्याची धमकी दिल्यामुळे या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या तक्रारदार आईने पोलिसांना दिलेल्या जबानीत केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप तिच्यावर अटकेची कारवाई झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोमवारी दुपारी उघडकीस आलेल्या या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
40 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि तीन मुलांसोबत घाटकोपर परिसरात राहते. मृत शिवम हा तिचा तेरा वर्षांचा मुलगा आहे. ती तिच्या पतीसोबत बिगारी तर सतरा वर्षांचा मुलगा इलेक्ट्रीशियनचे काम करतो. याच परिसरात संध्या सोनावणे ही महिला राहते. तिच्या बहिणीच्या स्कूल बसला शिवमने आग लावली आहे असे सांगून तिने तिच्याकडून नुकसानभरपाई घेतले होते. सोमवारी दुपारी एक वाजता शिवम हा घरी होता. यावेळी संध्या ही त्यांच्या घरी आली होती. तिने शिवमवर पुन्हा आरोप केला होता. त्याने त्यांच्या गाड्या फोडल्या असून या गाड्याचे नुकसानीचे त्याच्याकडून भरपाई करुन घेणार असे सांगून शिवमला बघून घेण्याची धमकी दिली होती.
या धमकीनंतर तो प्रचंड घाबरला होता. दुपारी दिड वाजता शिवम हा घरातील पोटमाळ्यावर गेला होता. तो झोपायला गेला असावा असे समजून ती तिच्या कामाला लागली होती. काही वेळानंतर तिची मुलगी मोबाईल चार्जिंगसाठी पोटमाळ्यावर गेली होती. यावेळी तिला शिवमने तिच्या साडीने पोटमाळ्याच्या छताच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती मुलीकडून समजताच ती पोटमाळ्यावर गेली होती.
शिवमला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून सोडवून जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला.
तिच्या मुलाला संध्या सोनावणे हीच जबाबदार असल्याचा आरोप करुन तिने तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संध्या सोनावणे हिच्याविरुद्ध पोलिसांनी शिवमचा मानसिक शोषण करुन त्याला बघून घेण्याची धमकी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.