हायड्रोपोनिक गांजासह महिलांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक
बँकाँकहून आणलेले साडेबारा कोटीचा 1761 ग्रॅम गांजा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – हायड्रोपोनिक गांजासह दोन महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. शिफा रुस्तम सिद्धीकी आणि अलिझा फातिमा सलीम मिर्झा अशी या दोघींची नावे असून त्या मुंब्रा-कौसाच्या रहिवाशी आहेत. या दोघींनी बँकाँकहून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडून या अधिकार्यांनी 1761 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत साडेबारा कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर या दोघींना किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बँकाँकहून हायड्रोपोनिक गांजाचा मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने या अधिकार्यांनी बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्याच्या सामानाची झडती सुरु केली होती. शुक्रवारी शिफा आणि अलिझा या दोघीही बँकाँकहून आले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटताच या दोघींना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर आठ फळांसह फुलांचे प्लांट सापडले. त्यातून त्यांनी हायड्रोपोनिक गांजाची तस्करी केल्याचे उघडकीस आले.
त्यांच्या बॅगेतून या अधिकार्यांनी 1 किलो 761 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून त्याची किंमत 12 कोटी 58 लाख रुपये इतकी आहे. या दोघींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर या दोघींनाही या अधिकार्यांनी अटक केली. या दोघीही मुंब्रा-कौसा परिसरात राहतात.
काही दिवसांपूर्वी त्या दोघीही बँकाँकला गेल्या होत्या. बँकाँकहून त्यांना ते गांजा मुंबईत एका व्यक्तीला देण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन आणि विमान तिकिट देण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटकेनंतर शनिवारी दुपारी त्यांना किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.