बिल्डरला खंडणीसाठी धमकाविणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
लैगिंक अत्याचारासह आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील एका नामांकित बिल्डरला ब्लॅकमेल करुन २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सपना वजीर ऊर्फ लुबना अझान वजीर आणि जितेंद्र दोशी या दोघांविरुद्ध अंधेरी पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यातील सपना ही तक्रारदारांची मैत्रिण तर जितेंद्र हा भटजी आहे. सपनाने तक्रारदार बिल्डरला लैगिंक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यांत तसेच आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करुन समाजात बदनामीची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या धमक्यांना कंटाळून अखेर त्यांनी या दोघांविरुद्ध पोलिसांत केल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.
५५ वर्षांचे तक्रारदार व्यवसायाने बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात राहतात. त्यांचे अंधेरीतील पानिपत चौक, नागरदास रोडवर एक बांधकाम साईट आहे. जितेंद्र जोशी हा त्यांचा परिचित असून तो त्यांच्या घरासह कार्यालयात पूजापाठ करण्यासाठी येत होता. त्याच्यामार्फत जानेवारी २०२४ रोजी त्यांची सपना वजीरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यांच्यात मैत्रीपूर्ण सबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान त्यांनी तिला आर्थिक मदत केली होती. जानेवारी ते ऑक्टोंबर या कालावधीत त्यांनी तिला विविध कारणासाठी सुमारे ५० लाख रुपये दिले होते. मात्र या मदतीनंतरही ती सतत त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराची खोटी केस दाखल करुन जिवाचे बरे-वाईट करुन तिच्या आत्महत्येला तेच जबाबदार आहेत अशी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत होती.
अनेकदा प्रत्यक्षात भेटून तसेच कार्यालयात कॉल तसेच मॅसेज करुन ती त्यांना २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देत होती. पैसे दिले नाहीतर समाजात त्यांची बदनामी करण्याची सतत धमकी देत होती. तिच्याकडून खंडणीसाठी सुरु असलेल्या ब्लॅकमेलला ते प्रचंड कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार अंधेरी पोलिसांना सांगून सपना वजीर आणि जितेंद्र दोशी यांच्याविरुद्घ तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.