तीन विविध कारवाईत घातक शस्त्रांसह तिघांना अटक
मानखुर्द, विलेपार्ले व रे रोड येथे पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – तीन विविध कारवाईत घातक शस्त्रांसह तिघांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. इक्बाल वलीमोहम्मद शेख, लोकेश राजेश पुजारी आणि ऍलन फ्रॉन्सिस रॉड्रिक्स अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे जप्त केली आहे. यातील इक्बाल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून लोकेशला पोलिसांनी तडीपार केले होते. ही कारवाई सुरु असतानाही तो घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. त्यामुळे अशा शस्त्रांची विक्री करणार्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असातनाच विलेपार्ले येथील विद्यार्थिनी शाळेसमोरील तिलक उद्यानाजवळ काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याी माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एपीआय रणजीत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वाघे, पोलीस हवालदार महांगडे, मांडेकर, तासगांवकर यांनी शुक्रवारी सायंकाळी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून ऍलन रॉड्रिक्सला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन सापडली. ऍलन हा अंधेरीतील गावदेवी डोंगर, अल मदिना मशिद चाळीत राहतो. तो तिथे पिस्तूलची विक्रीसाठी आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या कारवाईत काळाचौकी पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस जप्त केले आहे. इक्बाल हा रे रोड रेल्वे स्थानकाजवळील कॉटनग्रीन सिमेंट गोदामाजवळ घातक शस्त्रांसह आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलानी, मराठे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, हवालदार परब, वळवी, शिपाई पाटील, सावंत, पालवी यांनी तिथे सापळा लावून ही कारवाई केली. तिसर्या कारवाईत लोकेश पुजारी या तडीपार गुन्हेगाराला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. लोकेश हा मानखुर्दच्या लल्लूपार्क कंपाऊंडमध्ये राहत असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी तडीपारची कारवाई केली होती. ही कारवाई सुरु असताना तो मानखुर्द रेल्वे स्थानकात शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. यावेळी त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक दळवी, पोलीस हवालीदार सोनावणे, दरेकर, भोसले, पोलीस शिपाई शेंडे यांनी अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस, मोबाईल सापडले. या तिघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.