मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – चोरीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीने आझाद मैदान पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. गांधीराज व्यकंट स्वामी असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला नंतर उपचारासाठी जी. टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गांधीराजविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी सकाळी आठ वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत घडली. गांधीराज स्वामी हा तामिळनाडूच्या वेल्लोर, गुडीआतमच्या नरीपट्टूचा रहिवाशी आहे. तो काहीच कामधंदा करत नव्हता. काही दिवसांपूर्वी आझाद मैदान पोलीस ठाण्यात एका चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्याच्या सेफ कोठडीत ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी आठ वाजता त्याने कोठडीच्या लोखंडी बारला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला गळफास घेण्यापासून परावृत्त केले. त्याला नंतर जी. टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सगन गायकवाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गांधीराजविरुद्ध ३०९ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कोठडी आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात त्याने मानसिक नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.