शहरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक

घाटकोपर व बोरिवली पोलीस ठाण्याच्या एटीएसची कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून बांगलादेश सीमेवरुन चोरट्या मार्गाने भारतात आल्यानंतर शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपर आणि बोरिवली पोलीस ठाण्याच्या एटीएस पथकाने अटक केली. नरुल मावला खान आणि अब्दुल्ला दिनू मुल्ला अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले असून या मोबाईलवरुन ते दोघेही बांगलादेशातील त्यांच्या कुटुंबियांच्या नियमित संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी केली होती. अशा घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच घाटकोपर येथे काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतरवरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक जयवंत पवार, पोलीस हवालदार शिरसाट, माने, पाटोळे यांनी रमाईनगर, गौसिया मशिदीजवळ साध्या वेशात पाळत ठेवून अब्दुल्ला मुल्ला या २२ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. सध्या तो नवी मुंबईतील घनसोली, शिवसह्याद्री अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील रुम क्रमांक चारमध्ये राहत होता. तीन महिन्यांपूर्वी तो बांगलोदशातून मुंबईत आला होता. तेव्हापासून तो बिगारी कामगार म्हणून काम करत आहे.

दुसर्‍या कारवाईत बोरिवली पोलिसांनी नरुल खान या ४० वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला अटक केली. नरुल हा बिगारी कामगार असून तो नालासोपारा येथील आचोळे तलावाजवळील विठ्ठल मंदिर परिसरात राहत होता. तीन दिवसांपूर्वी तो कामानिमित्त बोरिवलीतील अनिता सुपरमार्केट, भाजी मार्केजवळ आला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर, पोलीस हवालदार शेख, पोलीस शिपाई केसरे, रेवाळे यांनी नरुल याला भाजी मार्केट परिसरातून अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले असून या मोबाईलवरुन ते दोघेही त्यांच्या बांगलादेशातील कुटुंबियांच्या संपर्कात होते. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या दोघांना पुन्हा बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page