33 वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बांगलादेशी महिलेस अटक
भारतीय व्यक्तीशी विवाह करुन पासपोर्ट बनवून विदेशात प्रवास
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 मे 2025
मुंबई, – बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून 33 वर्षांपूर्वी भारतात आलेल्या एका बांगलादेशी नागरिक महिलेस सहार पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. मारियाखातून मोहम्मद मंसुर अली असे या महिलेचे नाव असून तिने एका भारतीय व्यक्तीशी विवाह त्याच्या नावाने बोगस दस्तावेज सादर करुन पासपोर्ट मिळवून सहा वर्ष कुवेत देशात नोकरी केली. याच पासपोर्टूवर तिने काही देशांमध्ये प्रवास केल्याचे तपासात उघडकीस आले. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
समीर गैबू पठाण हे इमिग्रेशन अधिकारी असून कुर्ला परिसरात राहतात. रविवारी रात्री ते विदेशातून येणार्या प्रवाशांच्या कागदपत्रांची पाहणी करत होते. रात्री अडीच वाजता कुवेतहून छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय मारियाखातून ही महिला आली होती. तिच्यावर संशय आल्याने तिला इमिग्रेशन अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान तिने ती बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. पंधरा वर्षांची असताना ती बांगलादेशातील उपासमारी आणि गरीबीला कंटाळून भारतात पळून आली होती.
1992 साली भारतात आल्यानंतर तिने अरविंदकुमार हिरालाल या भारतीय नागरिकाशी विवाह केला होता. त्याच्या नावाने भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनविले होते. या दस्तावेजाच्या आधारे तिने नऊ वर्षांपूर्वी म्हणजे 2016 साली मुंबई कार्यालयातून एक भारतीय पासपोर्ट मिळविले होते. या दरम्यान तिने तिच्या पासपोर्टचे दोन वेळा नूतनीकरण केले होते. 2019 साली ती नोकरीसाठी कुवेतला गेली होती. गेल्या सहा वर्षांपासून ती कुवेतला नोकरी करत होती. यावेळी तिने काही देशांमध्ये प्रवास केला होता.
सहा वर्षांनंतर ती 25 मे 2025 रोजी कुवेतहून पुन्हा भारतात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर तिला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्ताआले होते. याप्रकरणी समीर पठाण यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारियाखातून हिच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन गैरमार्गाने भारतीय पासपोर्ट बनविणे तसेच याच पासपोर्टवर विदेशात प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.