पंधरा ग्रॅम एमडी ड्रग्ज कारवाईनंतर ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

रेकॉर्डवरील ड्रग्ज तस्कराला पत्नी व सहकार्‍यासह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 एप्रिल 2026
मुंबई, – खार येथील एका कारवाईत पंधरा ग्रॅम ड्रग्ज जप्त केल्यानंतर आरोपींच्या चौकशीतून अंधेरीतील एका एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत एका रेकॉर्डवरील ड्रग्ज तस्करासह त्याची पत्नी आणि सहकारी अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ मोहम्मद इलियास शेख, रिझवान लियाकत अली आणि नाजनीन आरिफ शेख अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी अंधेरीतील एका भाड्याच्या रुममध्ये एमडी ड्रग्ज बनविण्याची फॅक्टरी सुरु करुन तिथे तयार झालेले एमडी ड्रग्ज मुंबईसह इतर शहरात विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. नाजनीनच्या बँक खात्यातील सुमारे 26 लाखांची कॅश फ्रिज करण्यात आली असून तिच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाले आहे. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या वृत्ताला तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांनी दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण खार परिसरात एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हणमंत कुंभारे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हणमंत कुंभारे, पोलीस हवालदार कुंदन कदम, पोलीस शिपाई महेश लहामागे, विशाल भामरे, नामदेव सावंत, सुमीत अहिवाले, नितीन कोळेकर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. या कारवाईत पोलिसांनी आरिफ शेख याला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना पंधरा ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. चौकशीत आरिफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पंधराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील आठ गुन्हे एनडीपीएसचे होते.

अशाच दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत त्याला सुरत पोलिसांनी अटक केली होती. दहा वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याला पॅरोल मिळाला होता. मात्र पॅरोलवर बाहेर येताच तो पळून गेला होता. सुरत येथून मुंबईत आल्यानंतर त्याने लियाकतच्या मदतीने पुन्हा एमडी ड्रग्जचा व्यवसाय सुरु केला होता. गेल्या वीस वर्षांपासून तो ड्रग्ज व्यवसायात सक्रिय होता. गेल्या काही वर्षांपासून तो त्याची पत्नी नाजनीनसोबत सांताक्रुज येथील गोळीबार नगरात राहत होता. तिथे राहत असताना त्याने अंधेरी येथे तेरा हजारामध्ये एक भाड्याने रुम घेतली होती. या रुममध्ये त्याने एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. याकामी त्याला नाजनीन आणि रिझवान लियाकत अली मदत करत होते.

तपासात ही माहिती उघडकीस येताच पोलीस उपनिरीक्षक हणमंत कुंभारे, पोलीस हवालदार कुंदन कदम, पोलीस शिपाई महेश लहामागे, विशाल भामरे, नामदेव सावंत, सुमीत अहिवाले, नितीन कोळेकर यांनी सांताक्रुज येथून नाजनीन आणि रिझवान या दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत नाजनीनच्या बँक खात्यात एमडी ड्रग्जचे पैसे जमा होत होते. तिच्या बँक खात्यात 26 लाख रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. ही रक्कम फ्रिज करण्यात आली आहे. या तिघांच्या चौकशीत अंधेरीतील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झाला. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकला होता.

या कारवाईत पोलिसांना काहीही मुद्देमाल सापडला नाही. मात्र तिथे एमडी ड्रग्ज बनविले जात असल्याचे भक्कम पुरावे सापडले आहे. या रुममध्ये कच्चा माल आणल्यानंतर आरिफ आणि रिझवान हे एमडी ड्रग्ज बनवत होते. ते ड्रग्ज मुंबईसह इतर शहरात पाठविले होते. त्याचे पेमेंट नाजनीनच्या बँक खात्यात पाठविले होते. तिच्या बँक खात्यात गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हणमंत कुंभारे गुन्ह्यांचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page