व्यावसायिक वादातून 40 वर्षांच्या बँजो व्यावसायिकाची हत्या

दहाजणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल तर आठजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 एप्रिल 2026
मुंबई, – व्यावसायिक वादातून अंकुश मनोहर आंबोकर या 40 वर्षांच्या बँजो व्यावसायिकाची दहाजणांच्या टोळीने हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री दादर परिसरात घडली. याप्रकरणी दहाही आरोपीविरुद्ध दादर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात गौरव नथू सनस, अनिल ऊर्फ गचक्या, सिद्धेश पटेल, राजू पटेल, साहिल राणे, अजय यादव, नयन्या, अवी व इतर दोघांचा समावेश आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता दादर येथील नागोसयाची वाडी, सेंच्युरी बाजारकडे जाणार्‍या डॉ. येलमार हॉस्पिटलसमोर घडली. निता अंकुश आंबोकर ही महिला धारावीतील विकेवाडी, आकाश टॉवर अपार्टमेंटमध्ये राहत असून सध्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करते. अंकुश हा तिचा पती असून तो चालक म्हणून काम करतो. चालकासोबत त्याचा बँजोचा व्यवसाय आहे. आरोपी गौरव सनस हा त्यांच्या परिचित असून त्याचाही बँजोचा व्यवसाय होता. पूर्वी ते दोघेही एकत्र व्यवसाय करत होते. मात्र 2017 साली अकुश आणि गौरव यांच्यात वाद झालनंतर त्यांनी स्वतचा व्यवसाय सुरु केला होता. तेव्हापासून त्यांच्यात वाद सुरु होता.

अनेकदा त्यांच्यात व्यवसायावरुन खटके उडत होते. त्यातून गौरवने त्याला अनेकदा शिवीगाळ करुन मारहाण केली होती. यावेळी अंकुशने त्याच्याविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती. प्रत्येक वेळेस गौरव हा अंकुशला तुझा गेम करणार अशी धमकी देत होता. मात्र त्याकडे त्याने लक्ष दिले नव्हते. रविवारी दुपारी दोन वाजता निता ही नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. रात्री साडेनऊ वाजता अंकुश हा सेंच्युरी बाजारकडे जाणार्‍या डॉ. येलमार हॉस्पिटलसमोरुन जात होता. यावेळी तिथे गौरवसह त्याचे नऊ सहकारी आले होते. या सर्वांनी अंकुशला थांबवून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती.

या भांडणानंतर त्याीं त्याला हाताने आणि लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात त्याच्या पोटाला, पाठीला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. या मारहाणीत अंकुश हा बेशुद्ध पडला होता. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले होते. हा प्रकार निताला तिच्या एका मैत्रिणीकडून समजताच ती घटनास्थळी गेली होती. यावेळी तिला गौरवसह इतर आरोपी अंकुशला बेदम मारहाण करत असल्याचे, मारहाणीत अंकुश हा बेशुद्ध झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने इतर लोकांच्या मदतीने अंकुशला तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ही माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी निता आंबोकर हिच्याकडून घडलेला प्रकार पोलिसांना समजला होता. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दहाही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आठ आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page