पुण्यात वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी महिलांना अटक
दोन महिन्यांत दहा बांगलादेशींवर पवई पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी महिलांना पवई पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. प्रिया अख्तर मोहम्मद आलमगीर सरदार, अदुरी अलजार मुल्ला, नर्गिस अलजार मुल्ला, अयोई ऊर्फ राणी लबलू खान, खादिजा जन्नत रोकेन आणि शकीला मोहम्मद अब्दुल लतीफ अशी या सहा महिलांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांत पवई पोलिसांनी एका कुटुंबातील चौघांसह सहा महिलांना अशा दहा बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. बांगलादेशातील बेरोजगारीसह गरीबीला कंटाळून बांगलादेशी नागरिक भारतात येत असून वेगवेगळ्या शहरात नोकरीसाठी राहत असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यामुळे अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच 29 जानेवारला पवई पोलिसांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस हवालदार उदय लांडगे, सुभाष खंडागळे, दिपक बोरसे आदी पथकाने दोन संशयित बांगलादेशी नागरिकांना अटक केली.
सलमान कुद्रुस गाझी आणि शराफत कुद्रुस गाझी अशी या दोघांची नावे होते. ते दोघेही सख्खे बंधूं असून बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यांच्या चौकशीत त्यांची आई आणि भाऊ नवी मुंबईतील कौपरखैरणे परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या पथकाने नवी मुंबईतून अरजीना कुद्रुस गाझी आणि शब्बीर कुद्रुस गाझी या दोघांना अटक केली होती. याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असताना या आरोपींनी त्यांच्या परिचित काही बांगलादेशी महिला पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती सांगितली होती. या महिला पुण्यातील हडपसर फुरंसुगी तसेच उरुळी कांचन परिसरात राहत असून तिथेच काम करत होते.
या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे, पोलीस निरीक्षक सुशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस हवालदार उदय लांडगे, सुभाष खंडागळे, दिपक बोरसे, महिला पोलीस शिपाई कांबळे, खरात आदीचे एक पथक पुण्याला पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित बांगलादेशी महिलांचा शोध घेऊन प्रिया सरदार, अदुली मुल्ला, नर्गिस मुल्ला, राणी खान, खादिजा रोकेन आणि शकीला लतीफ या महिलांना अटक केली.
चौकशीत त्यांनी त्या बांगलादेशी असल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन या सर्वांना त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.