बँक लॉकरमधून ६६ लाखांच्या सोन्याचा दागिन्यांची चोरीसह अपहार

मध्यप्रदेशातून बँकेच्या कर्मचार्‍याला तीन महिन्यानंतर अटक व कोठडी

0

अरुण सावरटकर
१५ सप्टेंबर २०२६
मुंबई, – गोरेगाव येथील एका नामांकित बँकेच्या लॉकरमधून ड्युब्लिकेट चावीच्या सहाय्याने सुमारे ६६ लाखांच्या हिरेजडीत सोन्याचे दागिने, सोन्याचे कॉईन आदी मुद्देमालाची चोरी करुन अपहार केल्याप्रकरणी बँकेच्याच एका कर्मचार्‍याला दिडोंशी पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. गौरव रामेश्‍वर शर्मा असे या आरोपी कर्मचार्‍याचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानेच दागिन्यांची चोरीसह अपहार केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून संबंधित हिरेजडीत दागिने, कॉईन हस्तगत केले जाणार आहे. बँकेच्या कर्मचार्‍यानेच लॉकरमधून दागिन्यांची चोरी केल्याचे उघडकीस येताच त्याच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.

कोमल हेमंत कानोडिया ही महिला गोरेागव येथील गोकुळधाम, लक्षचंडी हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहत असून तिचे पती हेमंत कनोडिया हे कापड व्यापारी आहेत. तिच्यासह तिचे पती, सासू-सासरे, दिर, त्याची पत्नी आदी सर्वांचे गोरेगाव येथील एका नामांकित बँकेत खाते आहे. तिथेच त्यांनी एक लॉकर घेतला असून त्याचा क्रमांक ५७० असा होता. या लॉकरचा कोमल आणि हेमंत कानोडिया हे दोघेच वापर करतात. त्यंानी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचे सोन्याचे, हिरेजडीत दागिने, सोन्याचे कॉईन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लॉकरमध्ये ठेवला होता. त्याची एक चावी त्यांच्याकडे तर दुसरी मास्टर चावी बँकेत असते. दोन्ही चाव्या लावल्यानंतरच लॉकर उघडता येते. अनेकदा मॅनेजर आधी त्यांची मास्टर चावी लावतात आणि नंतर त्यांनी चावी लावल्यानंतर लॉकर उघडले जाते. कोमल आणि हमंत कानोडिया हे दोघेही नियमित बँकेत येऊन काही दागिन्यांसह कॅश काढून नंतर ते पुन्हा लॉकरमध्ये ठेवत होते.

२५ ऑक्टोंबर २०२४ रोजी हेमंत कनोडिया हे बँकेत गेले होते. त्यांनी लॉकर उघडले असता त्यांना लॉकरमधील काही सोन्याचे, हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि सोन्याचे कॉईन असा ६६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल दिसून आला नाही. त्यामळे त्यांनी त्यांची कोमलला ही माहिती दिली होती. तिने लॉकरमधून दागिने काढले आहेत का याबाबत विचारणा केली. तिने नकार देत बँकेत धाव घेतली होती. या दोघांनी लॉकरमधील दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात त्यांना पंधरा लाखांचे सोन्याचे कॉईन, प्रत्येकी दोन पंधरा लाखांचे दोन डायमंड सेट, त्यात हिर्‍याचा नेकलेस, हातातील हिर्‍यांच्या बांगड्या, कानातील रिंग, पाच लाखांचे विविध सोन्याचे दागिने, सव्वासहा लाखांचा गळ्यातील नेकलेस, कानातील झुमके, दहा लाखांचा एक सोन्याचा सेट, त्यात नेकलेस, बांगड्या, झुमके, अंगठ्या आदी ६६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल मिसिंग असल्याचे दिसून आले.

ही चोरी १६ जुलैला ते २५ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत झाली होती. बँकेच्या अज्ञात कर्मचार्‍याने बोगस चावीचा वापर करुन त्यांच्या लॉकरमधून विविध सोन्याचे, हिर्‍याचे दागिने तसेच सोन्याचे कॉईन असा मुद्देमालाची चोरी करुन अपहार केला होता. याप्रकरणी कोमल कानोडिया हिने बँक मॅनेजरकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बॅकेने त्याची गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली होती. या चौकशीचा अहवाल नंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या वतीने कोमल कानोडिया यांना दिडोंशी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

या हल्ल्यानंतर तिने जून जून २०२६ रोजी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात बँक कर्मचार्‍याविरुद्ध विविध सोन्याचे, हिर्‍याचे दागिने आणि सोन्याच्या कॉईनची चोरी करुन अपहार केल्याप्रकरणी तक्रार केली होती.  या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात कर्मचार्‍याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी प्रत्येक बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती.

या जबानीनंतर मध्यप्रदेशच्या जबलपूर येथून पोलिसांनी गौरव शर्मा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात गौरव हा पूर्वी याच बँकेच्या गोरेगाव येथील शाखेत कार्यरत होता. तिथे काम करताना त्याने कोमल कानोडिया हिच्या बँक लॉकरची ड्युब्लिकेट चावी बनविली होती. या चावीच्या सहाय्याने त्याने लॉकरमधील ६६ लाख २५ हजाराच्या हिरे, सोन्याचे दागिने आणि सोन्याचे कॉईन आदी मुद्देमालाची चोरी करुन दागिन्यांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून लवकरच चोरीसह अपहार केलेले दागिने हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली आहे, त्याने अशाच प्रकारे इतर काही लॉकरमधून मुद्देमाल चोरी केला होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page