बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक
चार गुन्ह्यांची उकल करुन सहा चोरीचे बाईक हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ सप्टेंबर २०२६
मुंबई, – बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला मुलुंड पोलिसांनी अटक केली. संदीप नारायण वंजारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने बाईक चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून साडेतीन लाखांच्या सहा चोरीच्या बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
२५ ऑगस्टला मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका बाईक चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन होनवडजकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धोंडे, पोलीस हवालदार संदीप आव्हाड, पोलीस शिपाई संतोष चाकणकर, गणेश कट्टे, रमेश ढेंबे, रोहित बच्छेराव, प्रदीप पवार आदी पथकाने तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी संदीप वंजारीला ताब्यात घेतले.
चौकशीत संदीप हा मुलुंडच्या मुलुंड कॉलनी, राहुलनगर परिसरात राहत असून तो बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार बाईक चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांतील चार बाईकसह एकूण सहा चोरीच्या बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. या बाईकची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. संदीपविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बाईक चोरीसह घातक शस्त्रे बाळगणे, दरोड्याची पूर्वतयारी करणे अशा सात गुन्ह्यांची नोंद आहे.
१९ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक
दुसर्या कारवाईत १९ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस शिवाजीनगर पोलिसांच्या अधिकार्यांनी अटक केली. मोतीलाल फुलेना चौरसिया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
२००७ साली मोतीलाल याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जमीन महसूल सहिता अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुरुवातीला अटक वॉरंट काढण्यात आले होते. तरीही तो कोर्टात हजर राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध लोकल कोर्टाने जाहीरनामा जारी केला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना मोतीलाल हा मानखुर्द परिसरात येणार असल्यासची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौधरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खाडे, पोलीस शिपाई बाबर आदी पथकाने त्याला मानखुर्द येथून अटक केली. गेल्या १९ वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.